घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सराईत चोरटा अजित व्यंकप्पा पवार उर्फ लिंग्या जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 01:39 PM2021-03-20T13:39:09+5:302021-03-20T13:39:25+5:30
१२ लाख ७८ हजार ४५० रुपये किमतीचे ३३, तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी केले हस्तगत
पिंपरी : बंद घरांच्या खिडकीचे गज कापून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून १२ लाख ७८ हजार ४५० रुपये किमतीचे ३३, तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
लिंग्या उर्फ अजित व्यंकप्पा पवार (वय ३०, रा. जेऊर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट पाचचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना घरफोडी करणाऱ्या आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह औरंगाबाद येथे जाऊन वाळूज परिसरातून वाळूज पोलिसांच्या मदतीने आरोपी पवार याला ताब्यात घेतले. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला घरफोडीचा गुन्हा त्याने त्याच्या इतर तीन साथीदारांसह केला असल्याचे आरोपी पवार याने कबूल केले आहे. आरोपी पवार याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच हिंजवडी, देहूरोड, भोसरी, चाकण व आळंदी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपी पवार हा पाहिजे आरोपी आहे.
चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला बेड्या
आरोपी पवार याने घरफोडी करून चोरी केलेले दागिने तो एका व्यापाऱ्याकडे विक्री करीत होता. गुन्ह्यातील मुद्देमाल त्याने एका व्यापाऱ्याला दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संदीप अंकुश केत (रा. सम्राट चौक, अक्कलकोट, जि. सोलापूर), या व्यापाऱ्याला अटक केली. त्याला सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
वेशांतर करून चार दिवस पोलिसांचा वॉच
आरोपी पवार हा औरंगाबाद येथील वाळूज परिसरात त्याच्या नातेवाईकांकडे आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचे पथक वाळूज परिसरात गेले. तेथे चार दिवस वेशांतर करून आरोपी पवार याच्यावर वॉच ठेवून त्याला ताब्यात घेतले.
गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहायक निरीक्षक राम गोमारे, उपनिरीक्षक प्रसन्ना जऱ्हाड, पोलीस कर्मचारी धनराज किरणाळे, दत्तात्रय बनसुडे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, सावन राठोड, राजेंद्र साळुंखे, मयूर वाडकर, नागेश माळी, संदीप ठाकरे, शामसुंदर गुट्टे, नितीन बहिरट, दयानंद खेडकर, राजकुमार इघारे, भरत माने, गोपाळ ब्रमांदे, गणेश महाडिक, सचिन मोरे, निलम शिवथरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.