दिवसाढवळया घरफोडी करणारे चोरटे जाळयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:54 PM2018-08-29T17:54:08+5:302018-08-29T17:58:38+5:30
पुणे, पिंपरी चिंचवड शहरात चोरी कलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने चोरट्यांनी उत्तरप्रदेशमधील त्रिकुट येथील सराफाला विकले आहेत.
पिंपरी : पॅन्टमध्ये कटावणी अडकवुन फिरत असताना बंद सदनिका दिसुन येताच त्या ठिकाणी दिवसाढवळया चोऱ्या करायच्या अशी गुन्ह्याची विशिष्ट पद्धती (मोडस आॅपरेंडी) अवलंबलेले दोन चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसुन आल्याने त्यांना जेरबंद करता आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह २१४.५ ग्रॅम वजनाचे सुमारे सहा लाख ७० हजार रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत १८ घरफोड्या केल्या असून त्यातील १२ गुन्हे उघडकीस आले आहेत,अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घरफोडीच्या घडणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी ज्या परिसरात घरफोड्या झाल्या. त्या ठिकाणी गस्त वाढवली. तेथून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ११ आॅगस्टला सांगवीतील चंद्रहिरा सोसायटीच्या आवारात झालेल्या घरफोडीच्या अनुषंगाने तपास केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.त्यावेळी चोरटे त्यात कैद झाल्याचे निदशर््नास आले. शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या रविकरण माताबदल यादव (वय २२) आणि अनुपम नरेंद्र त्रिपाठी (वय २४,रा. मोरया पार्क गल्ली ) या दोन चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी केली असता, सांगवी, भोसरी, कोथरूड, कोंंढवा या ठिकाणी त्यांनी १८ घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यातील १२ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून ६ लाख ७० हजार ५०० रुपए किंमतीचे २१४.५ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले. त्यांनी विमाननगर, कोथरूड आणि हिंजवडी परिसरात केलेल्या चोरीच्या चार गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे.
अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, परिमंडल दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे,पोलीस उपनिरीक्षक संदीप बागूल तसेच अरूण नरळे आणि शिमोन चांदेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
उत्तर प्रदेशात दागिन्यांची विक्री
पुणे, पिंपरी चिंचवड शहरात चोरी कलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने चोरट्यांनी उत्तरप्रदेशमधील त्रिकुट येथील सराफाला विकले आहेत. दोघेही आरोपी मुळचे उत्तरप्रदेशचे आहेत. आरोपी त्रिपाठी रियल इस्टेटचा व्यवसाय करीत असे. तर रविकिरण यादव याचे बाणेर येथे दुचाकी दुरूस्तीचे गॅरेज आहे. सांगवी परिसरात त्यांनी दिवसाढवळ्या तब्बल नऊ घरफोड्या केल्या आहेत.