चेंबरची झाकणे चोरणारे चोर सापडेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 02:34 AM2018-10-31T02:34:12+5:302018-10-31T02:34:51+5:30
महापालिकेच्या संबंधित विभागाची डोकेदुखी, अपघात झाल्यानंतरच येणार का जाग?
रहाटणी : अनेक दिवसांपासून साई चौक ते कोकणे चौक या बीआरटीएस रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाचे पाणी योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी भूमिगत ड्रेनेज आहे. ठिकठिकाणी चेंबर व त्यावर लोखंडी झाकण तयार केले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून अनेक चेंबरवरील झाकणे चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याने महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
मागील काही दिवसांपासून साई चौकापासून चेंबरवरील लोखंडी झाकण चोरीच्या प्रकारास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत अनेक झाकणे चोरीला गेल्याने महापालिकेचा संबंधित विभाग चक्रावला आहे. रोज एक लोखंडी झाकण चोरीला जात असल्याने चोर पकडण्याचे आव्हान पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यापुढे उभे राहिले आहे.
रहाटणी येथील साई चौक ते कोकणे चौक या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावरील चेंबर रस्त्यावर अथर्व मार्केटच्या समोर ४५ मीटर बीआरटी रस्त्यावरील स्ट्रॉम वॉटर लाईनच्या चेंबरवरील लोखंडी झाकण चोरीला गेलेले आहे. एक नव्हे तर अनेक झाकणे चोरीला गेली आहेत. एक एक करून या रस्त्यावरील सर्वच चेंबरवरील लोखंडी झाकणे चोरीला जातील की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे.
पावसाचे पाणी योग्य प्रकारे निचरा व्हावा म्हणून महापालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यावर भूमी अंतर्गत स्ट्रॉम वॉटर लाइन टाकली. त्यासाठी ठिकठिकाणी चेंबरची निर्मिती केली. मात्र चेंबरवर लोखंडी झाकण असल्याने सध्या भंगार विक्रेते ही झाकणे चोरून नेत आहेत. मात्र, चेंबरवर झाकण नसल्याने यात मोठा अपघात होऊन एखाद्याला जीव गमवावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन लोखंडी चेंबर चोरीला कसे जाणार नाहीत, याची उपाययोजना करावी अन्यथा मोठा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही.
मागील काही दिवसांपासून रहाटणी, काळेवाडी परिसरातील रस्त्यावरील चेंबरचे लोखंडी झाकणे चोरीला जाण्याचे प्रकार वाढलेले आहेत. या झाकणांना कापून चोरून नेले जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अगदी तुटपुंज्या पैशासाठी नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू झालेला आहे. याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे असून, पोलीस प्रशासन किंवा महापालिकेच्या संबंधित विभागाचे कर्मचारी-अधिकारी यांनी अशा चोरट्यांवर नजर ठेवून ही चोरी रोखणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा अशा चेंबरमध्ये जीव गमवावा लागेल.
या रस्त्यावरील स्ट्रॉम वॉटर लाईनचे चेंबर सुमारे सहा ते सात फूट खोल आहेत आणि हा रस्ता मुख्य वाहतुकीचा असल्याने यात एखादे वाहन पडून अपघात होण्याची परिस्थिती निर्माण झाली. पिंपळे सौदागर ते
वाकड हा मुख्य वाहतुकीचा व रहदारीचा रस्ता आहे. हे चेंबर वाटसरूच्या किंवा वाहनचालकाच्या नजरेस सहजासहजी पडत नाही.
त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. हे चेंबर फूटपाथच्या अगदी जवळ असल्याने एखादा वाटसरूदेखील यात पडू शकतो.