घरातून मोबाईल लंपास करणारा चोरटा ‘जाळ्यात’; सव्वातीन लाखांचे ३१ मोबाईल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 12:26 PM2022-07-24T12:26:54+5:302022-07-24T12:27:02+5:30
लोकांच्या घरातून चोरलेल्या या मोबाईलचा आरोपीने स्वत:ही वापर केला
पिंपरी : चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या अट्टल गुन्हेगारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून तीन लाख २० हजार रुपये किमतीचे ३१ मोबाईल हस्तगत केले. निगडी पोलिसांनी ही कारवाई केली. लोकांच्या घरातून चोरलेल्या या मोबाईलचा आरोपीने स्वत:ही वापर केला. त्यामुळे आरोपीपर्यंत पोहचण्यास पोलिसांना मदत झाली.
दत्ता संतोष धोत्रे (वय २०, रा. ओटास्कीम, निगडी), असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीचे मोबाईल विक्रीसाठी एकजण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. धोत्रे हा ट्रान्सपोर्टनगर भागामध्ये मोबाईल फोन विक्री करण्यासाठी आला. पोलिसांना संशय आला. त्यावेळी त्याला पोलीस पकडत असताना तो पळून जात होता. त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. त्याच्याकडे चार मोबाईल फोन मिळून आले. तसेच त्याने निगडी, महाळुंगे, तळवडे तसेच पिंपरी -चिंचवड पुणे परिसरात रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या घरातून मोबाईल फोन चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. चोरीचे मोबाईल फोन त्याच्या तोंडओळखीचा हर्षीत शामनारायण सिंह (वय २२, रा. महाळुंगे ता. खेड, मूळगाव सिध्दीकला, ता. रावसंगज, जि. सोनभद्र, उत्तरप्रदेश) याला विकले असल्याचे धोत्रे याने सांगितले. हर्षीत सिंह याचा महाळुंगे परीसरात शोध घेऊन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सिंह याच्याकडे चोरीचे दोन मोबाईल फोन मिळून आले.
धोत्रे याने चोरी करून लपवून ठेवलेले १५ मोबाईल फोन जप्त केले. तसेच हर्षीत हा दत्ता धोत्रे याच्याकडून चोरीचे मोबाईल घेऊन तो त्याच्या गावी उत्तरप्रदेश येथे पाठवित असल्याचे हर्षित याने पोलिसांना सांगितले. धोत्रे याने हर्षित याला विकलेले १० मोबाईल फोन त्याच्याकडून हस्तगत केले. आरोपी हे चोरीचे मोबाईल स्वत: देखील वापरत होते.
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल कोरडे, पोलीस कर्मचारी सुधाकर अवताडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.