पीएमपीमधील प्रवाशांचे पाकीट मारणारी महिला वाकड पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:55 AM2017-12-16T11:55:46+5:302017-12-16T11:57:37+5:30
पीएमपी बसमध्ये प्रवाशी बनून इतर प्रवाशांची पर्स, पाकीट, बॅग पळविणारी सराईत चोर महिला वाकड पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.
पिंपरी-चिंचवड (वाकड) : पीएमपी बसमध्ये प्रवाशी बनून इतर प्रवाशांची पर्स, पाकीट, बॅग पळविणारी सराईत चोर महिला वाकड पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. तिला डांगे चौक थेरगाव येथून अटक करण्यात आली.
वनिता राख साखरे (वय ४०, रा. हडपसर) असे त्या सराईत चोर महिलेचे नाव असून १२ डिसेंबरला प्रवासादरम्यान एका महिलेची दीड तोळ्याची चैन असलेली पर्स तीने पळविली होती. तो गुन्हा वाकड ठाण्यात दाखल आहे, त्यासह खडकी आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हे दाखल आहेत. तिचे छायाचित्र वाकड पोलिसांकडे असल्याने तपास पथक अनेक महिने तिच्या मागावर होते.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिकडच्या काळात वाकड पोलिसांच्या हद्दीतून पीएमपी बस मधून चोरीच्या घटना वाढल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी योजना आखली त्यानुसार सकाळी ८ ते ११ या वेळेत पीएमपी बस मधून पोलीस साध्या वेशात प्रवास करीत होते. शुक्रवारी दुपारी १२च्या ती डांगे चौकातील बीआरटी बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत थांबली असता पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिने वाकड हद्दीत केलेला गुन्हा कबूल केला असून मुद्देमालाबाबत पोलीस तपास करीत आहेत.