बनावट चावीने एटीएम उघडून पावणेदहा लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 08:46 PM2020-03-08T20:46:41+5:302020-03-08T20:48:13+5:30
बनावट चावीचा वापर करुन चाेरट्यांनी एटीएम उघडून पैसे लुटल्याची घटना समाेर आली आहे.
तळेगाव दाभाडे : बनावट चावीच्या सहाय्याने एटीएम मशिनचा दरवाजा उघडून नऊ लाख ७१ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. तळेगाव दाभाडे येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला.
बँकेचे शाखा व्यवस्थापक शैलेश गोपीनाथ पाखरे (वय ५९, रा. येरवडा, पुणे) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ७ मार्च) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अज्ञात चोरट्याने तळेगाव दाभाडे येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये प्रवेश केला. बनावट चावीच्या सहाय्याने मशीनचा दरवाजा उघडला. त्यानंतर मशीनमधून चोरट्याने नऊ लाख ७१ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.