आॅफलाइन माहितीद्वारे आॅनलाइन चोऱ्या; एटीएम, डेबिट कार्ड वापरणे ठरतेय असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:35 PM2017-12-08T12:35:58+5:302017-12-08T12:40:31+5:30
हायटेक चोरटे कोणाच्याही बँक खात्यातील रक्कम एटीएम, डेबिट कार्डाचा क्रमांक वापरून परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वर्ग करू लागल्याचे प्रकार घडू लागले आहेत.
संजय माने ।
पिंपरी : दुचाकीवरून येणारे चोरटे गळ्यातील सोनसाखळी हिसकावतात, घरफोडीत घरातील किमती वस्तू चोरीस जातात... या चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न तरी होतो; मात्र हायटेक चोरटे कोणाच्याही बँक खात्यातील रक्कम एटीएम, डेबिट कार्डाचा क्रमांक वापरून परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वर्ग करू लागल्याचे प्रकार घडू लागले आहेत. यामध्ये अनेकांची लाखोंच्या रकमेची फसवणूक होत असून, चोरट्यांचा शोध घेणेही अवघड होऊ लागले आहे.
हिंजवडी परिसरातील एटीएम केंद्रांमध्ये छुपे कॅमेरे लावून चोरट्यांनी ग्राहकांचे गोपनीय पिन क्रमांक, बँक खात्याची अन्य माहिती मिळवून परस्पर त्यांच्या बँक खात्यातून रक्कम दुसऱ्या खात्यांमध्ये वर्ग केली. क्लोन कार्डद्वारे बंगळुरू आणि चेन्नई येथे असलेल्या ग्राहकांच्या बँक खात्यातील रकमेची चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे हिंजवडी येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून डेटा चोरीचा हा प्रकार पोलीस तपासात निदर्शनास आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकारे किमान १० ते १५ बँकांच्या एटीएममध्ये स्किमर बसवून डेटा चोरी करून कार्ड क्लोन तयार केले असण्याची शक्यता सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वाकड परिसरात एका हॉटेलातील रोखपाल ग्राहक ज्या वेळी क्रेडिट, डेबिट कार्डाचा वापर करतात, त्या वेळी लक्ष ठेवून एटीएम कार्डाचा क्रमांक लिहून घेई. नंतर त्या क्रमांकाच्या आधारे संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर खर्च करी. हा प्रकार मागील आठवड्यात वाकड येथे उघडकीस आला. गोपनीय पासवर्डचा वापर करून सत्संग भवन खडकी परिसरातील विविध बँकांच्या १७ एटीएममधून सुमारे एक कोटी ३५ लाख ३४ हजार ७०० रुपये रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.
एटीएम केंद्रात सेवा पुरविणाऱ्या कंपनीशी संबंधित कर्मचाऱ्यांनी या रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले. खडकी पुणे येथील एटीएम केंद्रांची आॅडिटरमार्फत माहिती घेतली असता, त्या शाखेत काम करणाऱ्या कामगारांनी २१ पैकी १७ एटीएम केंद्रांवर पासवर्डचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले.
एटीएममध्ये स्किमरबरोबर छुपा कॅमेरा बसवून ग्राहकाने कार्ड स्क्रॅच केल्यानंतर त्यांचा डाटा आणि पिनची माहिती त्यात कैद होते.