जीबीएस आजाराचा पुण्यात तिसरा बळी; पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू
By प्रकाश गायकर | Updated: January 31, 2025 15:04 IST2025-01-31T15:02:12+5:302025-01-31T15:04:45+5:30
आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये १३ रुग्णांना जीबी सिंड्रोमची लागण झाली आहे. त्यापैकी ५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे

जीबीएस आजाराचा पुण्यात तिसरा बळी; पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू
पिंपरी : गुलियन बॅरो सिंड्रोमची (जीबी सिंड्रोम) लागण झालेल्या पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय व्यक्तीचा संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात मृत्यू झाला. या व्यक्तीला जीबी सिंड्रोमची लागण झाली होती. त्यांची नर्व कंडक्शन चाचणी २२ जानेवारीला सकारात्मक (पॉझिटिव्ह) आली होती. यापूर्वी जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या एका ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय व्यक्ती खासगी कंपनीचे वाहन चालवत होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास व गिळता येत नसल्याने २१ जानेवारीला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल केले. दाखल करतेवेळी या रुग्णाला न्यूमोनिया असल्याने श्वास घेण्यास त्रास होत होता. जीबीएसची लक्षणे दिसत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी जीबीएसचे निदान करण्यासाठी आवश्यक असणारी नर्व कंडक्शन तपासणी करण्याचा निर्णय घेतला. ही चाचणी २२ जानेवारीला करण्यात आली. त्याचा तपासणी अहवाल सकारात्मक आल्याने या रुग्णाला जीबी सिंड्रोमची लागण झाली असल्याचे निदान झाले.
दरम्यान, उपचार सुरू असताना या रुग्णाचा गुरुवारी (दि. ३०) रात्री मृत्यू झाला. या रुग्णालाय जीबी सिंड्रोमची लागण झाली असली तर न्यूमोनियामुळे श्वसन संस्थेवर आघात झाल्याने या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा दावा वैद्यकीय विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केला आहे.
१३ रुग्णांना लागण
आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये १३ रुग्णांना जीबी सिंड्रोमची लागण झाली आहे. त्यापैकी ५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित ६ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन
जीबी सिंड्रोम या आजाराला घाबरून न जाता लक्षणे दिसल्यावर त्वरित तपासणी करण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. तसेच या आजाराची योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी यासाठी महापालिकेच्या वतीने हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ७७५८९३३०१७ या क्रमांकावर फोन करून नागरिकांना माहिती घेता येणार आहे.
मृत झालेल्या ३६ वर्षीय रुग्णाला न्यूमोनिया हा आजार होता. तसेच जीबी सिंड्रोमचीही लागण झाली होती. न्यूमोनिया झाला असल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. जीबीएसची लागण झाली असली तरी इतर आजाराने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पिंपरी चिंचवड शहरामध्ये जीबीएस या आजाराचा धोका नाही. तसेच वैद्यकीय विभाग सज्ज असून सर्वेक्षणासाठी पथकांची नियुक्ती केली आहे. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.