‘हा माझ्या आत्महत्येचा व्हिडिओ आहे, मित्रांनो व्हायरल करा’, हिंजवडीत सहाव्या मजल्यावरून तरुणाची उडी
By नारायण बडगुजर | Updated: April 5, 2025 16:32 IST2025-04-05T16:31:07+5:302025-04-05T16:32:04+5:30
माझे सुसाइड करण्याचे एकमेव कारण म्हणजे घरी मला मेंटली खूप त्रास दिला जातोय, सुसाईडला कारणीभूत माझे २ चुलत भाऊ आहेत

‘हा माझ्या आत्महत्येचा व्हिडिओ आहे, मित्रांनो व्हायरल करा’, हिंजवडीत सहाव्या मजल्यावरून तरुणाची उडी
पिंपरी : ‘हा माझ्या आत्महत्येचा व्हिडिओ आहे. मित्रांनो व्हायरल करा’, असा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करून तरुणाने इमारतीच्या सहव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तरुणास आत्महत्येस प्रवृत्त करणार्या दोन भावांना पोलिसांनी अटक केली. हिंजवडी फेज २ येथे १२ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.
तेजस बाजीराव सोनागरे (२०, रा. विठ्ठलवाडी, देहुगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक किशन हरिभाऊ कांदे (३७) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. ४) फिर्याद दिली. नीलेश ऊर्फ गोलू संजय पुंडे (२५) आणि मंगेश संजय पुंडे (२३, दोघेही रा. तळवडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस सोनागरे हे हिंजवडी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. संशयितांनी आपसांत संगनमत करून तेजस सोनागरे यांना मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तेजस यांनी हिंजवडी येथील बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओमध्ये आपल्या आत्महत्येस नीलेश पुंडे आणि मंगेश पुंडे हे दोघे जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली.
..असा आहे व्हिडिओ
तेजस सोनागरे याने आत्महत्या करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड केला. जो कोणी हा व्हिडिओ पाहतोय, तो जेवढा व्हायरल होईल तेवढा व्हायरल करा, धिस इज माय सुसाइड व्हिडिओ, माझे सुसाइड करण्याचे एकमेव कारण म्हणजे घरी मला मेंटली खूप त्रास दिला जातोय. सगळ्यात पहिलं जर मी कामाला येतोय, मी माझी सॅलरी कमावतोय, ऑबियसली मी जे सेव्हिंग करतोय ते माझ्या स्वत:साठी सेव्हिंग करतोय. माझ्याकडे किती पैसे आहेत, किती उरले हे विचारायचा काय हक्क आहे कोणाला? या सुसाईडला सगळ्यात मुख्य कारणीभूत आहेत ते माझे दोन चुलत भाऊ नीलेश पुंडे आणि मंगेश पुंडे. मित्रांनो हा व्हिडिओ जेवढा व्हायरल करता येईल तेवढा प्लीज करा, असा व्हिडिओ तेजस यांनी इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.