जे विश्वासघात करत नाहीत त्यांना पुरस्कार दिले जातात: नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 08:26 AM2022-08-31T08:26:11+5:302022-08-31T08:28:59+5:30
जे विश्वासघात करत नाहीत त्यांना पुरस्कार दिले जातात. आज ज्यांना पुरस्कार मिळाला आहे.
पिंपरी :
जे विश्वासघात करत नाहीत त्यांना पुरस्कार दिले जातात. आज ज्यांना पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी सामान्य माणसांची विश्वासर्हता कमावली आहे. त्यामुळे ते उध्दवश्री पुरस्कार प्राप्त ठरले आहेत, असे प्रतिपादन उपसभापती नीलम गो-हे यांनी चिंचवड येथे केले.
उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली २२ वर्षे उध्दवश्री पुरस्कार दिला जातो. त्याचे वितरण झाले. त्याप्रसंगी नीलम गो-हे बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचीन अहिर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, वैभव थोरात, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले, अनिकेत घुले आदी उपस्थित होते.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, उद्धवश्री पुरस्कार वितरण करणा-या संयोजकांचे कौतुक आहे. तसेच पिंपरी-चिंचवडची गुणवंतनगरी म्हणून नवी ओळख होत आहे. कामाची पावती म्हणजे पुरस्कार असतात. त्यातून इतरांची आपल्यावर असलेली विश्वासर्हता आजमावता येते. शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण आहे. तेच आम्ही करणार, आगामी निवडणुकांच्या कालावधीतही आपण एकजूट राहून शिवसैनिक विजयाचा धनुष्यबाण खेचून आणणार आहे.
VIDEO: जे विश्वासघात करत नाहीत त्यांना पुरस्कार दिले जातात- नीलम गोऱ्हे pic.twitter.com/rpNrxa2Brc
— Lokmat (@lokmat) August 31, 2022
सचिन अहिर म्हणाले, पक्षनिष्ठा कार्यकर्त्याना शिकवावी लागत नाही. कार्यकर्ता समाजासाठी जगत असतो. त्याला कुटुंबासाठीही वेळ देता येत नाही. पक्षप्रमुखांच्या नावाने पुरस्कार देणे हे खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते. संयमाचे प्रतीक म्हणजे हा पुरस्कार आहे. नीलम गोऱ्हेचे कौतुकास्पद काम, राजकीय पटलावरील भूमिका बजावण्याची उल्लेखनीय काम नीलम गो-हे यांनी केले आहे. तसेच काम इतर राजकीय नेत्यांनी करण्याची नागरिकांची अपेक्षा असते.
संस्थेच्या २५व्या वर्धापणदिनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील अथवा केंद्रात असतील, अशी अपेक्षा अहीर यांनी व्यक्त केली. पक्ष संकटात असताना असे उपक्रम राबविणे कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
बाळासाहेबांचे आपण सर्वच मानसपुत्र
योगगुरू रामदेवबाबा मुंबईत आले असता बाळासाहेब ठाकरेचे खरे मानसपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे म्हटले आहे. त्यावर बोलतांना गो-हे म्हणाल्या, सगळी शिवसेनाचं बाळासाहेब ठाकरेंची मानसपुत्र आहे. बाळासाहेब मतभेद असणारांनाही प्रेमाची वागणूक द्यायचे. त्यामुळे त्यांचा मानसपुत्र कोणी एक होवू शकत नाही, आपण सर्व त्यांचे मानसपुत्र आहोत.