आत्महत्येचा विचार आला तर तातडीने 'या' नंबरवर करा फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:36 AM2023-01-17T11:36:30+5:302023-01-17T11:38:13+5:30
प्रेरणा प्रकल्पांतर्गत २४ तास हेल्पलाइनवरून समुपदेशन केले जाते...
पिंपरी : बेरोजगारी, कौटुंबिक हिंसाचार, छळ, आजार व नैराश्यातून आत्महत्या करण्याचे प्रकार वाढले आहेत. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्यांच्या कुटुंबीयांकडून मदतीसाठी प्रेरणा प्रकल्पाच्या १०४ हेल्पलाइनवर संपर्क साधला जातो. तेथून समुपदेशन केले जाते. तसेच या प्रकल्पांतर्गत आशासेविका यांच्याकडून शहरात नियमित सर्वेक्षण केले जाते. यात अशा रुग्णांची अथवा व्यक्तींची माहिती संकलित करून त्यांना मदत उपलब्ध करून दिली जाते.
पिंपरी-चिंचवड शहरात आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. विविध कारणांमुळे संबंधित आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. यातील काहीजणांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो. कुटुंबीय तसेच नातेवाईक आणि मित्र किंवा इतरांच्या सतर्कतेमुळे त्यांना वाचविण्यात यश येते. त्यानंतरही संबंधितांकडून आत्महत्येचा प्रयत्न केला जातो. मानसिक संतुलन बिघडल्यानेदेखील असा प्रयत्न काहीजणांकडून सातत्याने केला जातो. अशा व्यक्तींना समुपदेशकांकडे नेले जाते. तसेच तत्काळ मदत उपलब्ध व्हावी म्हणून राज्यस्तरावर प्रेरणा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यासाठी १०४ हा हेल्पलाइन क्रमांक आहे.
काय आहे ‘प्रेरणा प्रकल्प’
प्रेरणा प्रकल्पांतर्गत २४ तास हेल्पलाइनवरून समुपदेशन केले जाते. आरोग्यसेवेबाबत असलेल्या तक्रारी, आरोग्याच्या समस्या ऐकून घेतल्या जातात. तक्रारींबाबत संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली जाते. त्यानंतर त्यावर झालेल्या कारवाई व कार्यवाहीबाबत तक्रारदाराला माहिती दिली जाते.
शहरात दीडशेवर आशा वर्करकडून सर्वेक्षण
पिंपरी-चिंचवड शहरात दीडशेहून अधिक आशासेविका आहेत. त्यांच्याकडून शहरात नियमित सर्वेक्षण केले जाते. घरोघरी भेट देऊन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती नोंदवून घेतली जाते. नाव, वय, लिंग, साथीचे आजार, मानसिक आजार, अशी माहिती संकलित केली जाते. प्रेरणा प्रकल्पासाठी ही माहिती उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतर आवश्यकतेनुसार संबंधित व्यक्ती किंवा रुग्णाला वैद्यकीय उपचार किंवा समुदेशन केले जाते.
केवळ फोनवरून होते समुपदेशन
प्रेरणा प्रकल्पाच्या हेल्पलाइनवर केवळ फोनवरून समुपदेशन होते. प्रत्यक्षात मदत पाहिजे असल्यास महापालिकेच्या किंवा शासकीय रुग्णालयात धाव घ्यावी लागते. तेथील मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशन करतात.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत दाखल गुन्हे
वर्ष - आत्महत्येच्या घटना
२०१९ - ५५
२०२० - ३७
२०२१ - ५८