चिखलीतील आगीत हजारो बेघर! संसार जळून खाक, उपाशीपोटी कुडकुडत सारी रात्र रस्त्यावरच काढली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 11:37 AM2024-12-11T11:37:38+5:302024-12-11T11:38:00+5:30
भंगार साहित्याच्या गोदामाला आग लागल्याचे लक्षात येताच कामगार आणि चाळीत राहणारे लोक हातात सापडेल ते साहित्य घेऊन बाहेर पडले
पिंपरी : चिखलीतील कुदळवाडीमध्ये भंगार साहित्याच्या गोदामांना लागलेल्या आगीत शंभराहून अधिक शेड आणि कामगारांच्या खोल्या जळून खाक झाल्या. सोमवारी (दि. ९) सकाळी सुरू झालेल्या या अग्नितांडवाला २४ तास उलटून गेल्यानंतरही महापालिका प्रशासन बाधित नागरिकांकडे फिरकले नाही. सगळा संसार जळून खाक झाल्यामुळे हजारावर बेघरांनी लेकरा-बाळांसह थंडीत कुडकुडत रस्त्यावरच रात्र काढली.
भंगार साहित्याच्या गोदामाला आग लागल्याचे लक्षात येताच कामगार आणि चाळीत राहणारे लोक हातात सापडेल ते साहित्य घेऊन बाहेर पडले. काहींना तर तेवढाही वेळ मिळाला नाही. जीव वाचवण्यासाठी मुलाबाळांना कडेवर घेत ते रस्त्यावर धावले. आगीत गोदामांसह संसारही खाक झाला. या अग्नितांडवानंतर प्रशासन त्यांच्यापर्यंत मदतीसाठी पोहोचले नाही. परिणामी, सोमवारची रात्र थंडीत कुडकुडत रस्त्यावरच काढावी लागली. जीव मुठीत घेऊन घरातून बाहेर धावलेल्या या बेघरांजवळ अंगावरील कपड्यांशिवाय काहीच नाही. अनेकांचे पैसेही घरात राहिले. त्यामुळे मुलाबाळांना खाऊ घालण्यासाठीही काही नाही. काही सामाजिक संस्थांनी सोमवारी दुपारी आणि रात्री दिलेल्या वडापाव-समोशांवर कसेबसे भागवल्याची कैफियत त्यांनी मांडली.
मंगळवारीही आग धुमसतच होती. संसारातील काय वाचले, हे पाहण्यासाठी महिला आणि कामगारांनी गर्दी केली होती. मात्र, प्रापंचिक साहित्याची झालेली राखरांगोळी पाहून त्यांना हुंदका अनावर होत होता. कामगारांनी उरलेसुरले साहित्य वाहनांमध्ये भरण्यास सुरुवात केली होती. अग्नितांडवानंतर दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाची कोणतीच मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे कुठे राहायचे, काय खायचे, हा मोठा प्रश्न अग्नितांडवात घर-संसार गमावलेल्यांसमोर आहे.
अन्नात कालवली माती
गोदामांलगत असलेल्या खोल्यांमधील संसार पूर्णत: जळाला आहे. काही ठिकाणी भिंती कोसळल्याने घरातील धान्यात माती मिसळली आहे. अनेकांच्या धान्याच्या पिशव्या जळून खाक झाल्या आहेत. जळालेल्या धान्याच्या राखेकडे पाहत महिलांच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.
दोन वर्षांची कमाई क्षणात खाक
चाळीमध्ये राहणारे अनारउल्ला यांनी दोन वर्षांपासून काम करून पैसे साठवले होते. त्यांच्या घरात मुलगी, जावई आणि ते असे तिघे राहत होते. काम करून साठवलेले पैसे त्यांनी घरात ठेवले होते. मात्र, आगीत पैशांची राख झाली.
घरे अधिकृत तरी पाडली !
गोदामांशेजारीच काही खोल्या आहेत. परवानगी घेऊन अधिकृत बांधकाम केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. याबाबत शबाना कुरेशी म्हणाल्या, ‘‘माझ्या घराला आग लागली नव्हती, ती बाजूला लागली असतानाही माझे घर पाडले. मी परवानगी घेऊन घर बांधले आहे. कराची पावती आहे. लाईट बिलदेखील भरते. प्रशासनाने अधिकृत घर पाडले, पण चौकशी करण्यासाठी कोणीच आले नाही. संपूर्ण रात्र रस्त्यावर काढली.’’
माझ्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. आम्ही भाड्याने राहतो. पै-पै वाचवून जो काही संसार उभा केला होता, तो सर्व जळाला. आता आमच्याकडे काहीच शिल्लक नाही. आग लागून आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आता पुढे काय हा मोठा प्रश्न आहे. - कलिमू निसा, रहिवासी.
सात वर्षांपासून येथे राहण्यासाठी आहे. आगीत संसारातील एक भांडेसुद्धा वाचले नाही. आम्ही उघड्यावर आलो आहोत. दागिने, पैसे, कपडे सर्वच जळाले आहे. प्रशासनाने आमची सोय करावी. - मजीद कुरेशी, रहिवासी.