गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लूटमार करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 06:52 PM2019-11-25T18:52:22+5:302019-11-25T19:03:39+5:30
आरोपीवर व मारामारीचे पाच गुन्हे दाखल
देहूरोड : दारूच्या दुकानाच्या व्यवस्थापकास गावठी कट्टयाचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या गुन्हेगारास देहूरोड येथे रविवारी (दि. २४) रात्री दहाच्या सुमारास गस्तीवर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने पकडले. संबंधित गुन्हेगाराकडून गावठी कट्टा जप्त केला आहे. त्याच्यावर लूटमार व मारामारीचे पाच गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी अल्पवयीन असल्याचा फायदा घेत तो लूटमार करीत होता, असे देहूरोड पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या धाडसी कारवाईबाबत पोलीस आयुक्तांकडून पाच हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
दीपक पप्पू पांडे (वय १८, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी कट्टाही जप्त केला आहे. तर दीपक अशोक शिरसाठ (वय २८) असे पाच हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस कर्मचारी शिरसाठ यांनी फोर्स वनचे प्रशिक्षण घेतलेले आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड बाजारपेठ येथील राजू देवमणी यांना त्यांचे दुकानातच गावठी कट्टा दाखवून लुटण्याचा प्रयत्न करत असताना बाजारात गस्त करणारे देहूरोड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी शिरसाठ यांनी दुकानाजवळ जाऊन पांडे याच्याशी झटापट करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील गावठी कट्टा जप्त केला. त्याच्यावर लूटमार व मारामारीचे पाच गुन्हे दाखल असून यापूर्वी अल्पवयीन असल्याचा फायदा घेत तो लूटमार करीत होता. पांडे यास गावठी कट्ट्यासह पकडण्याची धाडसी कार्यवाही करणारे पोलीस कर्मचारी दीपक शिरसाठ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी माहिती मिळताच पाच हजार रोख व प्रशंसापत्र तात्काळ जाहीर केले आहे.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सहपोलीस आयुक्त प्रकाश मुत्त्याल, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ दोनचे उपायुक्त विनायक ढाकणे, देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करीत आहेत.