जलचरांचे अस्तित्त्व धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 02:45 AM2018-07-26T02:45:46+5:302018-07-26T02:46:06+5:30

ओढे-नाल्यांतून ग्रामपंचायतींचे सांडपाणी सोडले जाते नदीपात्रात

Threatens the existence of aquifers; Neglect in the administration | जलचरांचे अस्तित्त्व धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

जलचरांचे अस्तित्त्व धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

Next

- सचिन शिंदे

तळेगाव स्टेशन : आंबी वराळे गावच्या हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी तसेच नदीलगत असणाऱ्या ग्रामपंचायतीचे दूषित सांडपाणी मोठ्या प्रमाणात इंद्रायणी नदीपात्रात सोडल्याने नदीच गटारगंगा झाली आहे. या गटारगंगेमुळे नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्याने जलचरांचा मृत्यू होत आहे. या नदीच्या पाण्याला दुर्गंध येत असून, नदीचे पाणीच जलचर, प्राणी व मानवाच्या आरोग्यास धोकादायक झाले आहे. नदीपात्रात सोडले जाणारे रासायनिक व दूषित सांडपाणी रोखून नदीपात्रातील जलपर्णी काढून नदीचे पात्र स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या मावळ तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. मावळ तालुक्यात इंद्रायणी, पवना, कुंडलिका, सुधा, आंद्रा आदी नद्यांचे पात्र असून, पावसाळ्यात दुथडी वाहतात. मावळ तालुक्याला वरदान असलेल्या नद्यांचे पाणी अमृत मानले जात होते. त्याच नद्यांचे पाणी विष ठरले असून जलचर, प्राणी व मानवाच्या आरोग्यास धोकादायक झाले आहे .
औद्योगिक क्षेत्राचा दिवसेंदिवस विकास झाल्याने नागरीकरणात वाढ होत आहे. एकेकाळी ओस असलेली गावे दाट लोकसंख्येच्या शहरात रूपांतरीत होऊ लागली. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी, मैला, तसेच कचरा, ओढे व नाल्यातून पवित्र असलेल्या नदीपात्रात दिवसा ढवळ्या सोडले जात आहे.
तसेच ग्रामपंचायतीचे व गृहप्रकल्पांच्या दूषित सांडपाण्याचे व्यवस्थापन अथवा कोणतीही प्रक्रिया न करता सर्रास नदीपात्रात सोडले जात आहे.
इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाणारे औद्योगिक क्षेत्रातील, तसेच नागरी वस्तीतील दूषित पाणी त्वरित बंद करून नदीपात्रातील जलपर्णी काढून नदीचे पात्र स्वच्छ करण्याची मागणी इंदोरीमधील नागरिकांनी केली आहे.

> नदीपात्रात कपडे, म्हशी, बैल, गायी, शेळ्या व मेंढ्या सर्रास धुतात. इंद्रायणी नदी गटारगंगा झाल्याने मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. जलपर्णीच्या मुळ्या सर्वत्र पसरल्याने झपाट्याने जलपर्णी वाढत असून, पाण्याला उग्र दुर्गंध येत आहे. या जलपर्णीमुळे जलचरांचा मृत्यू होत असल्याने अनेक दुर्मिळ जातींचे जलचर नामशेष होत आहेत. नदीचे दूषित पाणी पिल्याने जनावरे आजारी पडत आहेत. नागरिकांना नदीच्या पाण्यामुळे त्वचेचे आजार होत आहेत. इंद्रायणी नदीचे पाणी मानवाला तर सोडाच जनावरांनाही पिण्यायोग्य राहिले नाही. जलपर्णीच्या विळख्यामुळे नदीचा परिसर विद्रूप झाला आहे.

Web Title: Threatens the existence of aquifers; Neglect in the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.