मर्डरची धमकी देत डॉक्टर पतीकडून पत्नीला मारहाण; मुळशी तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 03:58 PM2021-03-09T15:58:06+5:302021-03-09T15:58:35+5:30
सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी : दगडाने चारचाकी वाहनाची काच फोडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या बहिणीला मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळशी तालुक्यातील सूस येथे गुरुवारी (दि. ४) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
दिनकर शेशेराव मस्के (वय ३५, रा. नवी मुंबई), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ८) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी हे पती-पत्नी असून दोघेही डॉक्टर आहेत. दुसरे लग्न करायचे आहे, असे आरोपी म्हणाला. त्यामुळे फिर्यादी यांनी याबाबत विचारणा केली. मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही, असे लिहून दे, नाहीतर संध्याकाळी मी कामावरून घरी आल्यानंतर बघ काय करतो, अशी धमकी दिली. तसे लिहून न देता फिर्यादी त्यांच्या बहिणीसोबत चारचाकी वाहनातून पुणे येथे माहेरी येत होत्या. त्यामुळे आरोपी पतीला क्रोध अनावर झाला. थांब तू, मी आता सगळ्यांचा मर्डर करून टाकणार आहे. मी जेलमध्ये जायला तयार आहे, अशी धमकी आरोपीने फोनवरून दिली. त्यानंतर आरोपी हा फिर्यादीच्या माहेरी येऊन रस्त्यावर थांबला होता. फिर्यादी या चारचाकी वाहनाने तेथे आल्या असता आरोपीने दगड मारला. त्यामुळे वाहनाची काच फुटली. फिर्यादी यांनी त्यावेळी त्यांच्या मुलीचा जीव वाचवला. मात्र त्यांना मार लागला तसेच वाहन चालवत असलेली त्यांची बहीण जखमी झाली. त्यानंतर आरोपी हा फिर्यादी यांचे डोके वाहनाच्या दरवाजावर आपटू लागला. फिर्यादीच्या बहिणीने प्रतिकार केला. त्यावेळी आरोपीने त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. मी आता सगळ्यांचा मर्डर करून टाकणार आहे, अशी धमकी दिली. त्यावेळी जास्त गर्दी जमत असल्याचे पाहून आरोपी तेथून पळून गेला.