कामावरून काढण्याची धमकी, कर्मचाऱ्याची आत्महत्या; कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: October 18, 2023 09:30 AM2023-10-18T09:30:53+5:302023-10-18T09:31:32+5:30
याप्रकरणी कंपनीच्या व्यस्थापकावर गुन्हा दाखल केला...
पिंपरी : ओव्हर टाईम करून घेत सतत कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. तसेच मानसिक छळ केल्याने उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कंपनीच्या व्यस्थापकावर गुन्हा दाखल केला. गव्हाणे वस्ती, भोसरी येथे शनिवारी (दि. १४) सायंकाळी सहाच्या सुमारास आत्महत्येची ही घटना उघडकीस आली.
सुशील भीमसिंह पाटील (२७) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी सुशील याचा भाऊ सागर भीमसिंह पाटील यांनी भोसरी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. १६) फिर्याद दिली. त्यानुसार एस. एच. जे. इन्टेल टेक. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा ऑपरेशन मॅनेजर नीरज द्विवेदी याच्यावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील हा उच्चशिक्षित होता. तो एस. एच. जे. इंटेल टेक प्रायव्हेट लिमिटेड या मध्य प्रदेश येथील कंपनीत काम करत होता. त्याचे काम हे वर्क फ्रॉम होम होते. यावेळी इंटरनेटचा अडथळा आला किंवा इतर काही अडचणी आल्या तर व्यवस्थापक निरज हा सुशील याच्याकडून ओव्हरटाईम करून घेत होता. तसेच ओव्हरटाईम नाही केल्यास पूअर रिमार्क दिला जाईल व मी नोकरीवरून काढून टाकेन. इतर ठिकाणीही तुला काम मिळणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या आरोपी सुशील याला देत होता. दरम्यान सुशील याच्या कामांमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या. व्यवस्थापक निरज याने याप्रकरणी सुशीलला कोणतीही नोटीस न देता सरळ त्याला कामावरून काढून टाकले. वारंवार मानिसक व शारीरिक त्रास देऊन सुशील याला आत्महत्येस प्रवृत्त केले. या त्रासाला कंटाळून सुशील याने गव्हाणे वस्ती, भोसरी येथे त्याच्या राहत्या घरी शनिवारी गळफास घेत आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे.