बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार न करण्यासाठी सर्वसामान्यांना धमक्या : रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 05:21 PM2024-04-13T17:21:55+5:302024-04-13T17:22:12+5:30
कन्हेरी (ता. बारामती) येथे आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी हा आरोप केला आहे....
काटेवाडी / बारामती : तुम्ही पवारसाहेबांचा प्रचार करू नका. या प्रकारच्या धमक्या गुंडांकडून सर्वसामान्यांना दिल्या जात आहेत. याबाबत आम्हाला सर्वसामान्यांकडून माहिती मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अशी प्रथा यापूर्वी कधीही नव्हती. या प्रथेला यश आल्यास इथून पुढे फक्त गुंडांना पाळले जाईल, विकास कोणीही करणार नाही. दडपशाहीचे राजकारण वाढत जाईल, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
कन्हेरी (ता. बारामती) येथे आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी हा आरोप केला आहे. ते म्हणाले, अजितदादा मित्र मंडळाचा पक्ष, त्या पक्षाचे लाभार्थी व काही भाजपचे नेते बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना धमकावत आहेत, असे आमचे मत आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजप नेत्यांचे नाव न घेता केला आहे.
यावेळी त्यांनी थेट अजित पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, बारामतीची जनता ज्यांना मलिदा गँग म्हणून ओळखते असे काही लाभार्थी व ठेकेदार मंडळी सर्वसामान्यांना धमकावत आहेत. यामध्ये पीडीसीसी बँकेचे पदाधिकारी, कर्मचारी देखील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणात तुमची संपत्ती जप्त करू, अशा पद्धतीने धमकावत आहेत. तर शहरी भागात गुंडांचा वापर होत आहे. या भागात राहायचे असेल तर तुम्ही पवारसाहेबांचा प्रचार करू नका, असे सांगितले जात असल्याचा आरोप देखील रोहित पवार यांनी केला.
मोघम वक्तव्य करून भावंडांची बदनामी कशाला करता. भावांचे काय प्रकरण आहे हे लोकांसमोर येऊ द्या, सत्य समोर येईल, असा टोलाही अजित पवार यांना रोहित पवारांनी लगावला. तुमच्या प्रचारासाठी तुमची भावंडे, बहिणी यापूर्वी लोकांमध्ये फिरले आहेत. हे लोकांमध्ये जाऊन विचारले तर ते सांगतील, असेही पवार म्हणाले.