मुलांना आणि पतीला मारण्याची धमकी; तरुणाच्या त्रासामुळे महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 07:09 PM2023-08-09T19:09:24+5:302023-08-09T19:11:57+5:30
वारंवार तिला फोन करत पाठलाग करून मानसिक त्रास दिला...
पिंपरी : महिलेसोबत झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत तिच्या मुलांना आणि पतीला मारण्याची धमकी तरुणाने दिली. तसेच वारंवार तिला फोन करत पाठलाग करून मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून महिलेने घरातील डेटॉल नावाचे अँटीसेफ्टीक लिक्विड पित आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १५ मे २०२२ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत चिंचवडमध्ये घडली. या प्रकरणी महिलेने मंगळवारी (दि.८) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ऋषीकेश जालिंदर नागवडे (वय २८, रा.चिखली) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला तुझ्याशी बोलायचे असे म्हणत फिर्यादीकडून तिचा फोन नंबर घेतला. त्यानंतर आरोपीने वारंवार फोन करत फिर्यादीच्या मुलाला, पतीला मारण्याची धमकी दिली. फिर्यादीचा पाठलाग करत तिला देखील मारण्याची धमकी दिली. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून फिर्यादीने सोमवारी (दि.७) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.