पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पिस्तूल, दोन काडतुसे जप्त; दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 01:01 PM2022-01-05T13:01:19+5:302022-01-05T13:10:03+5:30
पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली
पिंपरी : दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, दोन काडतुसे जप्त करण्यात आली. इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. कृष्णाई पेट्रोल पंपाजवळ वडमुखवाडी येथे सोमवारी (दि. ३) रात्री पावणे अकराच्या सुमारास पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.
आकाश अनिल मिसाळ (वय २१, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील (वय ३०, रा. मु. पो. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (वय २६, रा. पाषाण, पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर करण आणि सनी (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावरही दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरोडा विरोधी पथकातील पोलीस नाईक सागर ज्ञानदेव शेडगे यांनी मंगळवारी (दि. ४) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडमुखवाडी, चऱ्होली येथील कृष्ण पेट्रोल पंपाजवळ आरोपी दरोडा घालण्याच्या उद्देशाने जमले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून तीन जणांना ताब्यात घेतले. तर दोघेजण पळून गेले. आरोपींच्या ताब्यातून दोन पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन, मिरचीपूड, नायलॉन दोरी, असा ऐवज जप्त केला.