रेल्वे मालगाडीच्या डब्यातून तांदूळ चोरणार्या तिघांना कामशेत पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 03:31 PM2017-11-03T15:31:12+5:302017-11-03T15:35:32+5:30
रेल्वे मालगाडीच्या डब्यातून अकरा पोती तांदूळ चोरणार्या तिघांना कामशेत पोलिसांनी अटक केली. गस्त घालत असताना पोलिसांना कामशेत परिसरात संशयितरित्या फिरत असलेले तीन आरोपी दिसून आले.
कामशेत : कामशेत रेल्वे स्थानकाच्या हद्दीत काही वेळ उभ्या असलेल्या रेल्वे मालगाडीच्या डब्यातून अकरा पोती तांदूळ चोरणार्या तिघांना कामशेत पोलिसांनी अटक केली.
सतीश मल्हारीनाथ कांबळे ( वय २६, रा . कासारवाडी), मधूकर महादेव खुडे (वय ३५, रा. शुक्रवार पेठ पुणे ), राज रमेश जाधव (वय २५, रा. पुणे ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कामशेतमध्ये गस्त घालत असताना सहाय्यक फौजदार अनंता शिंदे यांना कामशेत परिसरात संशयितरित्या फिरत असलेले तीन आरोपी दिसून आले. त्यांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले असता त्यांनी मालगाडीतून तांदूळ चोरून कामशेतमधील इंद्रायणी नदी लगतच्या स्मशानभूमी परिसरातील भात खचरात ठेवल्याची कबुली दिली.
कामशेत पोलिसांनी आरोपींसह सर्व माल हस्तगत करून लोणावळा रेल्वे पोलिसांना या बाबत माहिती दिली. लोहमार्ग पोलीस लोहकरे, रेल्वे सुरक्षा दलाचे प्रीती देशमुख, एस. सी. शर्मा, सी. टी. भोर, सी. टी. गायकवाड यांच्याकडे आरोपी व मुद्देमाल स्वाधीन स्वाधीन करण्यात आला.