तीन शेळ्यांचा बिबट्याने पाडला फडशा

By admin | Published: April 26, 2017 02:57 AM2017-04-26T02:57:19+5:302017-04-26T02:57:19+5:30

शिरूर तालुक्यातील दरेकरवाडी (ता. शिरूर) येथील माळवस्तीवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास मयूर दरेकर यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या

Three goats were trapped by a leopard | तीन शेळ्यांचा बिबट्याने पाडला फडशा

तीन शेळ्यांचा बिबट्याने पाडला फडशा

Next

कोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यातील दरेकरवाडी (ता. शिरूर) येथील माळवस्तीवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास मयूर दरेकर यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून तीन शेळ्या फस्त केल्या. दोन शेळ्या व एक करडू जखमी केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे.
तळेगाव ढमढेरे येथे रविवारी बिबट्याने शेळीवर हल्ला केला होता तर आज पहाटेच्या सुमारास दरेकरवाडी येथे ही घटना घडली.
बंदिस्त गोठ्यामध्ये पाच शेळ्या व एक करडू बांधलेले असताना पहाटेच्या सुमारास बिबट्याने जाळीच्या आतमध्ये असलेल्या शेळ्यांना पंजाच्या साह्याने ओढून बाहेर काढून तीन शेळ्या ठार केल्या. आतमध्ये असलेल्या दोन शेळ्या व एक करडू जखमी केले आहे. तर बाहेर काढलेल्या एका शेळीचे मुंडके तेथेच ठेऊन शेळीचे धड घेऊन बिबट्याने पोबारा केला. यानंतर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्याने दरेकर यांनी बाहेर येऊन पहिले असता बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला असल्याचे निदर्शनास आले. परंतु यावेळी सुदैवाने शेजारी असलेल्या गाईच्या गोठ्यामधील पाच-सहा गाई व चार कालवडी बचावल्या गेल्या आहेत.
यानंतर सकाळी उपसरपंच हिरामण दरेकर यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता वनरक्षक सोनाल राठोड, वनपाल आर. बी. ओव्हाळ, वनमजूर आनंदराव हरगुडे यांनी दरेकरवाडी येथे भेट दिली. पंचनामा केला असता सदर ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत.
यावेळी शासनाच्या वतीने शेतकऱ्याला लवकरच शेळ्यांची भरपाई मिळवून देण्यात येणार असून नागरिकांनी बाहेर पडताना दिवसा उजेडातच बाहेर पडावे, शेतामध्ये जाताना आवाज करत, गाणी वाजवत जावे, एकटे बाहेर पडू नये तसेच जनावरे बंदिस्त जागेत बांधावीत, असे आवाहन वनरक्षक सोनल राठोड यांनी केले आहे. या भागामध्ये शेतीचे प्रमाण जास्त असून जवळच नदी असल्यामुळे बिबट्याला येथे निवारा मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)

Web Title: Three goats were trapped by a leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.