द्रुतगतीवर तीन ठार, बोरजजवळील घटना: बसला ट्रकची धडक, सात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:57 AM2017-10-17T02:57:32+5:302017-10-17T02:57:44+5:30
मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर बोरज गावाजवळ नादुस्त झालेल्या एका खासगी प्रवासी बसला मागून भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी ठार आणि सात जण जखमी झाले.
लोणावळा : मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर बोरज गावाजवळ नादुस्त झालेल्या एका खासगी प्रवासी बसला मागून भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी ठार आणि सात जण जखमी झाले. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व प्रवासी दिवाळी सुट्टीनिमित्त मुंबईहून गावी चालले होते.
साहिल श्रीपती पवार (वय १६), तानाजी पांडुरंग नाईकवाडे (वय ३५), उमेश आबा नाईकवाडे (वय २२, सर्व रा. ठाणे; मूळ चरणगाव, ता. शिराळा, जि. सांगली).
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस (एमएच ४३ एन ३५३८) प्रवासी घेऊन दिवाळी सुटी व ग्रामपंचायत मतदानासाठी गावी निघाले होते. कामशेत बोगद्यापूर्वी असलेल्या बोरज गावाजवळ बसचा क्लच खराब झाल्याने चालकाने बस साइड लेनवर थांबवली होती. त्या वेळी वेगाने मागून आलेल्या ट्रकने (टीएन ८८ - ८८०४) बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये ट्रकचालक आहुल बाबू (वय ३८, रा चेन्नई) जखमी झाला असून, त्याच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अपघातानंतर आयआरबीच्या पथकाने सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत अपघातग्रस्त वाहने रस्त्यामधून बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.
उपचार सुरू : जखमींमध्ये बालकाचा समावेश
जखमींमधील दिनेश किसन कोळसे (वय २८) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. श्रीपती गणपत पवार (वय ४०), प्रवीण काशिनाथ नाईकवडे (वय २४), हिंदूराव दगडू नाईकवडे (वय ४८), प्रथमेश सुभाष शिंदे (वय १४), बाबाजी पांडुरंग नाईकवडे (वय ४२, सर्व सध्या रा. ठाणे, मूळ चरण, शिराळा, जि. सांगली) यांचा जखमीत समावेश आहे.