पाण्याची टाकी पडून तीन मजुरांचा मृत्यू, पंधरा जखमी; भोसरीतील सद्गुरु नगर येथील घटना
By नारायण बडगुजर | Published: October 24, 2024 12:18 PM2024-10-24T12:18:54+5:302024-10-24T12:19:37+5:30
भोसरी येथील या दुर्घटनेमुळे बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पिंपरी : बांधकाम साईटवर लेबर कॅम्प मधील पाण्याची टाकी पडून तीन बांधकाम मजुरांच्या जागीच मृत्यू झाला. तसेच १५ मजूर जखमी झाले. भोसरी येथे सद्गुरु नगरमध्ये गुरुवारी (दि. २४) सकाळी साडेसहाच्या सुमारास घटना घडली.
नोबीन जिन्ना (वय ४७), मल्ला नामांकूर (४५, रा. दोघेही रा. ओडीसा), सोनू कुमार (२४, रा. झारखंड) असे मृत्यू झालेल्या बांधकाम मजुरांचे नाव आहे. भोसरी येथील सद्गुरु नगर मध्ये बांधकाम प्रकल्प सुरू असून तेथील लेबर कॅम्प मध्ये मजुरांसाठी ४० खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. तसेच या मजुरांसाठी पाण्याची टाकी देखील उभारली होती. ही टाकी फुटून त्यात तिघांचा मृत्यू झाला तर इतर मजूर जखमी झाले. सकाळी आठच्या सुमारास घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल केले.
शहरात विविध बांधकाम प्रकल्प सुरू असून तेथे लेबर कॅम्प उभारण्यात आले आहेत. भोसरी येथील या दुर्घटनेमुळे बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.