लग्नाच्या आमिषाने तीन लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 05:01 AM2018-05-25T05:01:27+5:302018-05-25T05:01:27+5:30
फिर्यादी महिलेने मागील काही दिवसांपूर्वी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर विवाहेच्छू असल्याची नोंदणी केली
पिंपरी : विवाहनोंदणी संकेतस्थळावर ओळख झाली. त्यातूनच लग्नाचे आमिष दाखवून महिलेकडून ३ लाख ४० हजार रुपये आणि एक सोनसाखळी घेतली. त्यानंतर तो मुंबईला निघून गेला. त्याने महिलेशी संपर्क तोडला. पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महिलेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अरिचीत देसाई (वय ४३, रा. मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने मागील काही दिवसांपूर्वी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर विवाहेच्छू असल्याची नोंदणी केली. संकेतस्थळावर महिलेची देसाई या इसमाबरोबर ओळख झाली. देसाई याने, सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीस असून, महिन्याकाठी अडीच लाख रुपये पगार आहे. आई-वडील अमेरिकेत राहतात. तीन महिन्यांनंतर आॅस्ट्रेलियाला जाणार आहे, असे सांगितले. असे नियोजन असल्याने लवकरात लवकर लग्न करायचे आहे, असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. एवढेच नव्हे, तर वाकड परिसरात एक घर विकत घेऊ असे सांगून महिलेकडून त्याने तीन लाख ४० हजार रुपये उकळले. सोनसाखळी घेतली. ऐवज मिळाल्यानंतर संपर्क तोडून देसाई मुंबईला निघून गेला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. देसाईविरोधात माहिती-तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क) आणि भारतीय दंडसंहितेनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे तपास करीत आहेत.