बीआरटी मार्गात वाहन घातले अन् दंडापोटी तीन लाख भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 09:08 PM2022-06-06T21:08:37+5:302022-06-06T21:08:50+5:30
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या आठ विभागांमध्ये ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यात सांगवी विभागाने सर्वाधिक वाहनांवर कारवाई करून सव्वालाखांचा दंड आकारला.
पिंपरी : बीआरटी मार्गात घुसखोरी रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यासाठी शहरात रविवारी (दि. ५) विशेष मोहीम राबविण्यात आली. यात ६३८ वाहनचालकांवर तीन लाख १२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहरात बीआरटी मार्गातून काही बेशिस्त वाहनचालक त्यांच्या चारचाकी, दुचाकी दामटतात. त्यामुळे पीएमपीएमएल बसला अडथळा निर्माण होतो. तसेच बीआरटी मार्गात इतर वाहनांची घुसखोरी झाल्याने अपघाताचेही काही प्रकार घडल्याचे वेळावेळी समोर आले आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. यात काही एसटी बस तसेच टेम्पो व इतर अवजड वाहने देखील बीआरटी मार्गात घुसल्याचे समोर आले. अशा वाहनांवर देखील पोलिसांनी कारवाई केली.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या आठ विभागांमध्ये ही विशेष मोहीम राबविण्यात आली. यात सांगवी विभागाने सर्वाधिक वाहनांवर कारवाई करून सव्वालाखांचा दंड आकारला. त्यानंतर पिंपरी आणि वाकड यांनी देखील अशी मोठी कारवाई केली. यात वाहनाचालकांकडील लायसन्स, हेल्मेट, विमा आदींची देखील तपासणी करण्यात आली. वाहतूक शाखेचे उपायुक्त आनंद भोईटे आणि सहायक आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविली.
बीआरटी मार्गातून वाहन नेऊ नये. अन्यथा अशा बेशिस्त चालकांवर यापुढेही कारवाई सुरूच राहील. सर्वच वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. - आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा
बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनांवरील कारवाई
वाहतूक विभाग - केसेस - दंड (रुपयांमध्ये)
सांगवी - १९९ - १,२५,५००
वाकड - १०० - ६४,०००
पिंपरी - ११२ - ६०,०००
निगडी - ७० - ३७,०००
चिंचवड - ६८ - ३५,०००
भोसरी - ६३३१,५००
देहूरोड - १६ - ८०,०००
दिघी आळंदी - १० - ५,०००