तीन लाख लसीकरण; एकही तक्रार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 12:17 AM2018-12-19T00:17:07+5:302018-12-19T00:17:35+5:30
गोवर-रुबेला लस : नागरिकांना आवाहन
पिंपरी : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये २७ नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेमध्ये ९ महिने ते १५ वर्षाच्या बालकांना गोवर-रुबेला लस देण्यात येत आहे. शहरामध्ये आतापर्यंत ३ लाख २१ हजार ४८६ बालकांना गोवर-रुबेला प्रतिबंधक लस दिली असून, एकही मुलाच्या पालकांची तक्रार नाही. त्यामुळे नागरिकांनी बालकांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या शाळा, खासगी शाळा, नर्सरी, बालवाडी, अंगणवाडी व मनपा रुग्णालयांमध्ये १०१८ सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत ६ लाख १६ हजार बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट्ये ठेवण्यात आले आहे. लसीकरणासाठी महापालिकेचे सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, शाळेतील शिक्षक, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य मिळाले. शालाबाह्य बालके तसेच ज्या बालकांना अद्याप गोवर-रुबेला लसीकरण झाले नाही, अशा बालकांसाठी बाह्य सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी पालकांनी जवळच्या मनपा दवाखाना, रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.