ब्रिटनमधील नवीन कोरोनाचे तीन रुग्ण कोरोनामुक्त; चौदा दिवस 'होम क्वारंटाईन'बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 12:02 PM2021-01-13T12:02:29+5:302021-01-13T12:02:46+5:30
कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच ब्रिटनमधील नवीन स्ट्रेनचा विषाणू शहरात दाखल झाला होता.
पिंपरी : कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच ब्रिटनमधील एकूण सात जण पॉझिटिव्ह आढळले होते. तर त्यातील तीन जण नवीन कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. आज एकुण सातही जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडले आहेत.
चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर पिंपरी-चिंचवड मार्चमध्ये शहरात पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यानंतर ऑक्टोबरपासून रुग्णसंख्येत कमी होत आहे. कोरोनाचा विळखा सैल होत असतानाच ब्रिटनमधील नवीन स्ट्रेनचा विषाणू शहरात दाखल झाला होता. सुरूवातीला ब्रिटनहून आलेल्या २६८ जणांची तपासणी केली. त्यापैकी २७ डिसेंबरला सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असताना त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर हे रुग्ण नवीन कोरोनाचे आहेत किंवा नाहीत, हे तपासण्यासाठी प्रवाशांच्या घशातील द्रवाचे नमुने एआयव्हीकडे पाठविले होते. त्यापैकी चार जणांचे अहवाल निगेटिव्ह तर तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या सातही जणांवर भोसरीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोना पॉझिटिव्ह असले तरी या रुग्णांची प्रकृती ठणठणीत होती. या रुग्णांची पुर्नतपासणी केली. त्यात त्यांचे दोन दिवस कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील नवीन स्टेन आढळलेल्या एकाच कुटुंंबातील पती पत्नी आणि दोन वर्षांच्या लहान मुलाचा समावेश होता.
...........
ब्रिटनवरून आलेल्या प्रवाशांची प्रकृती ठणठणीत असल्याने सतरा दिवसांचे आयसोलेशन पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी सातही जणांना डिस्चार्ज दिला आहे. मात्र, त्यांना आणखी चौदा दिवसांचे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
डॉ. लक्ष्मण गोफणे (वैद्यकीय अधिकारी, भोसरी रुग्णालय)