बस प्रवासात चोरी करणाऱ्या तिघांना अटक ; तीन लाख ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 04:26 PM2020-01-10T16:26:35+5:302020-01-10T16:27:41+5:30
एसटी, पीएमपीएमएल बस, रिक्षा अशा प्रवासात करायचे चोरी
पिंपरी : एसटी, पीएमपीएमएल बस, रिक्षा अशा प्रवासात प्रवाशांचा किमती ऐवज लंपास करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहेत. पाच गुन्हे उघडकीस आले असून भोसरीपोलिसांनी ही कारवाई केली.
सोनी लखन सकट (वय २२), भाग्यश्री जितेश कसबे (वय २८) व सुनील श्रीकांत सोनवणे (तिघे रा. विश्रांतवाडी, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासात दागिने चोरी झाल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करत असताना कर्मचारी बाळासाहेब विधाते आणि सागर जाधव यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मालकाची ओळख पटवली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन महिला साथीदारांच्या मदतीने गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांचाकडून तीन लाख ३८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, संतोष महाडिक, संदीप जोशी, गणेश हिंगे, आशिष गोपी, सुमित देवकर, सागर भोसले, विकास फुले यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.