धरणात बुडताना तिघांना वाचवले, पंजाबच्या तरुणाचा मात्र मृत्यू; जाधववाडी नजीकच्या धरणातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:56 AM2024-05-28T10:56:28+5:302024-05-28T10:57:21+5:30
नवलाख-उंबरे येथील जाधववाडी नजीकच्या धरणात रविवारी (दि. २६) दुपारी ही घटना घडली....
पिंपरी : मित्रांसोबत आलेल्या पंजाब येथील तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झाला. नवलाख-उंबरे येथील जाधववाडी नजीकच्या धरणात रविवारी (दि. २६) दुपारी ही घटना घडली.
अंगदकुमार लखन गुप्ता (२६, रा. कोथरूड, मूळ - अमृतसर, पंजाब) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात राहणारे काही तरुण जाधववाडी धरण परिसरात विहारासाठी आले होते. रविवारी दुपारी अंगदकुमार आणि त्याचे तीन मित्र जाधववाडी धरणातील पाण्यात उतरले. पाण्यात पुढे जात असताना अचानक खड्डा आल्याने चौघांचाही तोल गेला आणि ते पाण्यात बुडू लागले. त्यावेळी पाण्याच्या बाजूला असलेल्या एका व्यक्तीने लगेच पाण्यात धाव घेऊन तिघांना बाहेर काढले. मात्र, अंगदकुमार याला ते वाचवू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिस, एनडीआरएफ पथक, घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम सुरू केली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची आपत्ती व्यवस्थापन समिती, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थांना देखील पाचारण करण्यात आले. तळेगाव एमआयडीसी पोलिस आणि ग्रामस्थांनी या शोधकार्यात मदत केली.