प्रवासी सुरक्षेचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:48 AM2018-02-24T01:48:47+5:302018-02-24T01:48:47+5:30
नियम पायदळी तुडवून प्रवासी चिंचवड स्टेशनवर पादचारी पुलाचा वापर न करता थेट रेल्वेरुळ ओलांडतात. सुरक्षा यंत्रणांची उदासीनता आणि रेल्वे प्रशासनाची बेफिकीरी याला कारणीभूत आहे.
चिंचवड : नियम पायदळी तुडवून प्रवासी चिंचवड स्टेशनवर पादचारी पुलाचा वापर न करता थेट रेल्वेरुळ ओलांडतात. सुरक्षा यंत्रणांची उदासीनता आणि रेल्वे प्रशासनाची बेफिकीरी याला कारणीभूत आहे. याला जोड मिळते ती प्रवाशांच्या निष्काळजीपणाची. या सर्व प्रकारात फरपट होते ती सुरक्षेची. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. यावर वेळीच उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
उद्योगनगरीतील चिंचवड स्टेशन अत्यंत वर्दळीचे आणि महत्त्वाचे आहे. या स्टेशनवर काही लांब पल्ल्याच्या गाड्या, तसेच सर्व लोकलना थांबा आहे. नियमित प्रवासी, विद्यार्थी व कामगारवर्गाची नेहमीच गर्दी असते. मात्र बरेच प्रवासी नियमांचे पालन करीत नाहीत. मनमानी पद्धतीने वागतात. या स्टेशनवर चार फलाट आहेत. स्टेशनवर प्रवेश करताना फलाटाच्या दोन्ही बाजूंना तिकीट खिडक्या आहेत. नियमित प्रवाशांची संख्याही मोठी आहे. या स्टेशनवर रेल्वेरुळ ओलांडण्यासाठी एक पादचारी पूल आहे; मात्र अनेक प्रवासी पुलाचा वापर न करता जीव धोक्यात घालतात आणि रेल्वेरुळ थेट ओलांडतात.
अशा प्रकारांमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. असे असतानाही याबाबत सुरक्षा यंत्रणा, रेल्वे प्रशासन किंवा प्रवाशांकडूनही खबरदारी घेण्यात येत नाही, ही गंभीर बाब आहे. अशा प्रवाशांवर कारवाई करण्यात येते; मात्र ती केवळ तात्पुरती. प्रवाशांच्या बेफिकिरीपुढे ही कारवाई निष्प्रभ ठरत आहे. परिणामी धोका पत्करून प्रवासी बिनदिक्कतपणे रेल्वेरुळ ओलांडतात.
फलाटावर लोकल आल्यानंतर अनेक प्रवासी चालू गाडीतून उतरतात. अनेक जण गाडी थांबण्यापूर्वी गाडीत चढण्याचा प्रयत्न करतात. या गडबडीत अनेक जण पडून जखमी होत आहेत.
पिंपरी स्टेशनवरही अशाच प्रकारची समस्या आहे. स्टेशनला लागून भाजी मंडई आहे. भाजी मंडईतून बाहेर पडणारे नागरिक रेल्वे रुळ ओलांडतात. पादचारी पुलाचा वापर प्रवासी आणि येथील नागरिकांकडून करण्यात येत नाही. त्यामुळे येथे अनेकदा अपघात झाले आहेत. रुळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. असे असतानाही चिंचवड आणि पिंपरी स्टेशनवर सुरक्षेबाबत उपाययोजना नाही.