त्या तिघी तिकडे मौजमजा करण्यात व्यस्त आणि इकडे पोलीस,कुटुंब चिंताग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 12:58 PM2018-11-20T12:58:27+5:302018-11-20T13:15:38+5:30
थोडी मौज मजा करावी म्हणून त्यांनी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेला जाण्यासाठी घर सोडले आणि दफ्तरासह चिंचवड रेल्वे स्टेशन गाठत लोणावळ्यात उतरल्या.
वाकड : काळेवाडी येथून सोमवारी (दि १९) सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेल्या आणि बेपत्ता झालेल्या तिन्ही शाळकरी मैत्रिणींना वाकड पोलिसांनीलोणावळा रेल्वे स्थानकातून रात्री नऊच्या सुमारास ताब्यात घेतल्याने त्यांच्या पालकांसह पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. केवळ मौज मजा करण्यासाठी त्यांनी लोणावळा गाठल्याचे स्पष्ट झाले आहे.
काळेवाडी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्या तिघी इयत्ता आठवीत शिकतात सततच्या पालकांच्या कटकटीने त्यांना कुठेही फिरायला मिळत नाही.त्यामुळे थोडी मौज मजा करावी म्हणून त्यांनी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेला जाण्यासाठी घर सोडले आणि दफ्तरासह चिंचवड रेल्वे स्टेशन गाठत लोणावळ्यात उतरल्या.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दोन पथके तयार केली तर तपास पथक प्रमुख हरिष माने यांनी त्या लोणावळ्यात असल्याची माहिती मिळविली. त्यानुसार कर्जत आणि लोणावळा स्थानकात वेगेवेगळे पथक तैनात होते.लोणावळ्यात दिवसभर मौज मजा केल्यानंतर त्या रात्री नऊच्या सुमारास पुन्हा लोणावळा रेल्वे स्थानकात आल्या. लोणावळ्यातुन मुंबईला जाण्याची त्यांची योजना होती; ते मुंबईच्या रेल्वेत बसणार त्याआधीच वाकड पोलिसांच्या तपास पथकाने त्यांना ताब्यात घेतले.