पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवकाळात बंदोबस्तासाठी ३ हजार पोलिसांचा फौजफाटा
By नारायण बडगुजर | Published: September 19, 2023 10:50 AM2023-09-19T10:50:39+5:302023-09-19T10:53:04+5:30
आयुक्तांलयांतर्गत तसेच बाहेरील अशा तीन हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे...
पिंपरी : गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयांतर्गत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी आयुक्तांलयांतर्गत तसेच बाहेरील अशा तीन हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत दीड दिवसाचे, तसेच पाच, सात, नऊ आणि दहाव्या दिवशीही गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे शहर व परिसरात उत्सवकाळात विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी मिरवणूक मार्ग व विसर्जन घाटांवर मोठा बंदोबस्त असतो. तसेच देखावे पाहण्यासाठी देखील मोठी गर्दी होते. त्यामुळे नोंदणीकृत असलेल्या मंडळांनाही आवश्यकतेनुसार बंदोबस्तासाठी स्वतंत्र पोलिस अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत.
दीड हजार मंडळे
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दीड हजारांपेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळांना परवानगी दिली आहे. यात काही मंडळे परवानगी न घेताही गणेशोत्सव साजरा करतात. तसेच काही हाउसिंग सोसायट्या, कंपन्या यांच्याकडूनही गणेशोत्सव साजरा केला जातो. हा गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
सर्वेलन्स व्हॅन
पोलिस आयुक्तालयाकडे तीन सर्वेलन्स व्हॅन आहेत. यातील दोन व्हॅन परिमंडळांकडे तर एक व्हॅन नियंत्रण कक्षाकडे आहे. आवश्यकतेनुसार या व्हॅनच्या माध्यमातून निगराणी केली जाते. तसेच पोलिसांची विविध पथके देखील कार्यान्वित केली आहेत. गणेशोत्सव कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर येते. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवासाठी बाहेरून बंदोबस्त मागवला आहे.
मंडळांचे पाच प्रतिनिधी नियुक्त
गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शेकडो गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी मंडळांना पोलिसांनी गर्दी, आवाज, सुरक्षा आदींबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक मंडळाचे पाच प्रतिनिधी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी नियुक्त केले आहेत. यासोबत ग्रामरक्षक दल, शांतता कमिटीची देखील मदत घेण्यात येत आहे.
शहरातील पोलिस बंदोबस्त
अपर आयुक्त - १
उपायुक्त - ५
सहायक आयुक्त - ८
निरीक्षक - ५४
सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक - १६५
अंमलदार - २२४०
होमगार्ड - ६००
एसआरपीएफ - २ कंपनी (२०० जवान)
बीडीडीएस - २ पथक