ट्रकला धडक बसल्यानं बाईकवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 05:34 PM2017-08-30T17:34:40+5:302017-08-30T17:35:58+5:30
पुणे-बंगळुरू महामार्गावर उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून येणा-या बाईकची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात बाईकवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड, दि. 30 - पुणे-बंगळुरू महामार्गावर उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून येणा-या बाईकची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात बाईकवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी उशीरा रात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास झाला. हे तिघंही मूळचे बिहारमधील रहिवासी असून ते एमबीएच्या शिक्षणासाठी पुण्यात रहात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपुल राजसिंग (वय २५), अमन राज (वय १९) आणि अश्विन अमरकुमार अगरवाल (वय १८ ) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावं आहेत. या प्रकरणी टेम्पोचालक शिवा सोमनाथ राठोड (वय ३०) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजतराज सिंग याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विपुल, अमन आणि अश्विन तिघे कोथरूड येथील एका नामांकित महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होते. ते मूळचे बिहारचे आहेत. मंगळवारी रात्री ते दुचाकीवरून (वाहन क्रमांक बीएचआर १ बीआर ७४०२) हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. विपुल दुचाकी चालवत होता. जेवण झाल्यानंतर परत येत असताना पुणे-बंगळुरू महामार्गावरील बावधान येथे विपुलचं बाईकवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या बाईकची रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला (वाहन क्रमांक, एमएच १२ एमव्ही ५४२८) जोरात धडक बसली. या अपघातात विपुल, अमन आणि अश्वीन या तिघांचा जागीच मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.