वेगाचा थरार, बेतला असता जिवावर; पुनावळे येथे भरधाव वाहन घुसले दुकानात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 12:33 AM2020-12-23T00:33:26+5:302020-12-23T00:33:35+5:30
भरधाव वेगातील चारचाकी वाहन थेट दुकानात घुसून दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले.
पिंपरी : भरधाव वेगातील चारचाकी वाहन थेट दुकानात घुसून दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले. कोयतेवस्ती, पुनावळे येथे मंगळवारी (दि. २२) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. वेगाचा हा थरार वाहनातील मुलांच्या जिवावर बेतला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मांगीलाल वागाराम जाट (वय ३२, सध्या रा. कोयतेवस्ती, पुनावळे, मूळ रा. राजस्थान) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अल्पवयीन वाहन चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अल्पवयीन मुले चारचाकी वाहन भरधाव वेगात घेऊन कोयतेवस्तीच्या दिशेने जात होते. त्यावेळी चालक चारचाकीवर नियंत्रण राखू न शकल्याने चारचाकी वाहनाने तीन ते चार पलट्या मारून थेट क्रिष्णा फर्निचर या दुकानात घुसली. दुकानातील ५० हजारांच्या लाकडी फर्निचरचे तसेच शेजारील कर्निक ग्लास डेकोर या काचेच्या दुकानाचे ३० हजारांचे नुकसान केले. तसेच वाहनातील एक अल्पवयीन मुलगा जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करीत आहेत.
अपघताची क्लिप व्हायरल
अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यामुळे अपघातस्थळी मोठी गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.