लोणावळ्यात पर्यटकांचा महापूर
By admin | Published: August 17, 2015 02:45 AM2015-08-17T02:45:21+5:302015-08-17T02:45:21+5:30
शनिवार व रविवारच्या सुटीला जोडून आलेल्या पतेतीच्या सुटीमुळे लोणावळ्यात शनिवारपासून हजारोंच्या संख्येंने पर्यटक दाखल झाल्यामुळे शनिवारी सकाळपासून द्रुतगती
लोणावळा : शनिवार व रविवारच्या सुटीला जोडून आलेल्या पतेतीच्या सुटीमुळे लोणावळ्यात शनिवारपासून हजारोंच्या संख्येंने पर्यटक दाखल झाल्यामुळे शनिवारी सकाळपासून द्रुतगती महामार्गासह लोणावळ्यात प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे़
मुंबईकर, तसेच पुणेकर पर्यटकांनी शनिवारी सकाळपासूनच लोणावळ्याच्या दिशेने आगेकूच केल्यामुळे खंडाळा घाटात तसेच, राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ द्रुतगती महामार्गावर दरडग्रस्त भाग असलेल्या खंडाळा बोगद्याजवळील मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेच्या तीनही लेन बंद ठेवण्यात आल्या आहे़त. यामुळे पुण्याकडून तीन लेनवरून येणारी वाहतूक येथे एका लेनवर घ्यावी लागते. यामुळे खंडाळा परिसरात प्रचंड वाहतूककोंडी झाली होती़ अखेर ही कोंडी सोडविण्यासाठी मुंबईकडे जाणारी सर्व हलकी वाहने वलवण येथून राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यात वळविण्यात आल्याने लोणावळ्यातही पाय ठेवायला जागा शिल्लक नव्हती़ मुंंबईकडून येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे खालापूर टोलनाका व अमृतांजन पूल भागात मोठी वाहतूक कोंडी झाल्याने द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती़ या कोंडीत बाहेर पडलेल्या पर्यटकांना पुन्हा भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावरील कोंडीत अडकावे लागल्याने पर्यटकांना पर्यटनाचा आनंद कमी व वाहतूककोंडीचा त्रासच जास्त सहन करावा लागला़
द्रुतगती महामार्गावरील वाहतूक राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आल्याने लोणावळ्यात शनिवार व रविवारी मोठी वाहतूककोंडी झाली होती़ शहरातील ही कोंडी सोडविताना पोलिसांचे प्रचंड हाल झाले होते़ कोंडीतून पुढे जाण्याच्या प्रयत्नांमध्ये वाहनचालकांनी राष्ट्रीय महामार्गावर तीन, चार लेन केल्यामुळे कोंडीत भर पडली होती़ (वार्ताहर)