थरार! मुंबई- पुणे महामार्गावर कारने घेतला अचानक पेट; सुदैवाने जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 08:28 PM2021-05-20T20:28:41+5:302021-05-20T20:34:02+5:30
आगीची भीषणता इतकी होती की काही मिनिटात तर कार जळून खाक झाली....
लोणावळा : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर गुुरुवारी (दि.२०) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका कारला अचानक लागलेल्या आगीत ती पूर्णपणे जळून खाक झाली. गाडीमधून धूर येऊ लागल्याने चालकासह अन्य दोनजण गाडी बाजूला घेऊन बाहेर उतरल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुद्दतरसर शेख हे त्यांची शेवरलेट क्रुझ गाडी क्र. (MH 02 CH 9387) मधून कुटुंबातील सदस्यांसह पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना, कामशेत बोगद्याच्या अलिकडे किमी ६९ जवळ गाडी आली असता, गाडीमधून अचानक धूर येऊ लागला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी बाजुला घेत गाडीमधून सर्वजण बाहेर आले. यानंतर काहीच क्षणात गाडीने पेट घेतला. आगीने पुर्ण गाडीला विळखा घातल्याने अग्नीशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल होईपर्यंत गाडी जळून खाक झाली होती.
घटनेची माहिती समजताच, आयआरबीच्या देवदूत टीमने तात्काळ घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून आग विझवली. परंतु कार पूर्ण जळून खाक झाली होती. या घटनेमुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.