बँकेच्या माध्यमातून विरोधकांच्या कारखान्यांची गळचेपी
By admin | Published: September 7, 2015 04:19 AM2015-09-07T04:19:21+5:302015-09-07T04:19:21+5:30
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे प्रतिनिधी म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर मदन देवकाते यांना न घेतल्यास कारखान्याला बॅँकेकडून कोणतीही मदत दिली जाणार नाही
बारामती : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे प्रतिनिधी म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर मदन देवकाते यांना न घेतल्यास कारखान्याला बॅँकेकडून कोणतीही मदत दिली जाणार नाही, असा दमच आमदार अजित पवार यांनी दिला. जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून विरोधकांच्या ताब्यातील कारखान्यांची गळचेपीच केली जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
बारामती येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी या प्रकारचे वक्तव्य केल्याने
सर्वांना आश्चर्य वाटले. राष्ट्रवादीच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या; पण जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून माळेगाव कारखान्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया काहींनी मेळाव्यानंतर खासगीत दिली.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव कारखान्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणली. या कारखान्यावर चंद्रराव तावरे गटाचे वर्चस्व आहे. माळेगाव कारखाना सध्या सुस्थितीमध्ये आहे. हंगाम सुरू करण्याच्या दिशेने कारखान्याचे नियोजन सध्या सुरू आहे. असे असताना सत्ता गेली तरी जुनेच राजकारण अजित पवार करताना दिसत आहेत.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मदन देवकाते यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना जिल्हा बॅँकेचे संचालक म्हणून निवडून आणले. आता बॅँकेचे प्रतिनिधी म्हणून देवकाते यांचीच माळेगाव कारखान्यावर नियुक्ती करावी, असा आग्रह अजित पवार यांचा आहे. वास्तविक ७६व्या घटनादुरुस्तीनुसार जिल्हा बँकेच्या प्रतिनिधीची कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड करणे नियमबाह्य आहे. तरीदेखील केवळ विरोधकांचा कारखाना म्हणून अजित पवार राजकारण करीत आहेत काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सहकारी बॅँक, जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून विरोधकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न यापूर्वीदेखील झालेला आहे. माळेगाव कारखाना राज्यातील अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो.
जिल्हा बॅँकेचे नियमित कर्ज फेडणारा कारखाना म्हणून या कारखान्याची ओळख आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले जाते. (वार्ताहर)