पड पड रे पावसा; तहानला जीव आता
By admin | Published: July 5, 2015 12:33 AM2015-07-05T00:33:24+5:302015-07-05T00:33:24+5:30
अकरा दिवसांपासून पावसाचा थेंबही पडला नाही. आभाळ कोरडेठाक पडले आहे. अशातच हवामान खात्याकडूनही पावसाची कोणतीच शक्यता वर्तविली जात नाही. ऐन भरातच पाऊस पळाल्याने
पिंपरी : अकरा दिवसांपासून पावसाचा थेंबही पडला नाही. आभाळ कोरडेठाक पडले आहे. अशातच हवामान खात्याकडूनही पावसाची कोणतीच शक्यता वर्तविली जात नाही. ऐन भरातच पाऊस पळाल्याने सर्वच क्षेत्रांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जूनच्या मध्यापासून शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्वत्रच जोरदार पाऊस बरसला होता. त्यामुळे शहरवासीयांसह सर्वांनाच उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळाला. आता मॉन्सूनच्या आगमनामुळे सुखावह दिवस येतील, असे आशादायक चित्र निर्माण झाले होते. दमदार पावसामुळे सर्वत्रच पुरेसा ओलावा झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी उरकून घेतली. सुरुवातीच्या पेरणीच्या पिकांची उगवणही चांगल्या प्रकारे झाली आहे. यामुळे आता पिके जोमदार येतील, अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली. मात्र, कोठे तरी माशी शिंकली अन् निसर्गाने नाराजी दाखविली. पावसाने अनपेक्षितपणे पाठ फिरविली आहे. मॉन्सूनचा प्रवास अर्ध्यावरच खंडित झाला. २४ जूनला शेवटचा पाऊस झाला आहे. त्यानंतर कोणत्याच भागात पाऊस पडला नाही. आता कमी दाबाचा पट्टा तयार होत नसल्याने पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज पुणे येथील हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे आठवडाभरातच पावसाळी वातावरण उलटे फिरले असून, आभाळ पुन्हा रखरखीत होऊ लागले आाहे.
तापमान ३१ अंशांपर्यंत वाढले
जुलै महिना पावसासाठीच ओळखला जातो. या काळात संततधार बरसणारा पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह वातावरणात पसरणाऱ्या गारठ्याचा प्रत्यय येतो. मात्र, या वर्षी पाऊस लांबल्याने वातावरणात उष्णता वाढू लागल्याचा विचित्र अनुभव येऊ लागला आहे. परिसरातील कमाल तापमान मागील दहा दिवसांतच २८ अंश सेल्सिअसवरून ३१ अंशांवर पोहोचले आहे. मोकळे आभाळ व वाढलेल्या तापमानाचा विचित्र अनुभव सध्या येत आहे. (प्रतिनिधी)