रस्त्यांवर चोख बंदोबस्त; मात्र पंतप्रधान हेलिकाॅप्टरने देहूत दाखल, पिंपरी-चिंचवडकरांचा झाला हिरमोड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 06:13 PM2022-06-14T18:13:08+5:302022-06-14T18:13:24+5:30
पिंपरी-चिंचवडकरांचा झाला हिरमोड
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोहगाव विमानतळावरून रस्तामार्गे देहूगाव येथे जाणार असल्याची शक्यता व्यक्त करून पोलिसांकडून पिंपरी-चिंचवड शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरवासीयांमध्ये देखील मोठी उत्कंठा होती. मात्र पंतप्रधान मोदी हे विमानतळावरून हेलिकाॅप्टरने देहू येथे दाखल झाले. त्यामुळे शहरवासीयांचा हिरमोड झाला. मोदी आलेच नाहीत. मात्र, उगाचच बंदोबस्त तैनात करून काय मिळाले, असा प्रश्न देखील वाहनचालक व नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला.
पंतप्रधान पहिल्यांदाच श्री क्षेत्र देहूगाव येथे येणार असल्याने देहूवासीयांसह पिंपरी-चिंचवड, खेड आणि मावळ तालुकावासीयांमध्ये मोठा उत्साह होता. प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांकडून देखील बंदोबस्ताचा आढावा घेण्यात येत होता. हवामानात बदल झाल्यास किंवा काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास विमानतळावरून हेलिकाॅप्टरऐवजी पंतप्रधान रस्ता मार्गे देहू येथे पोहचणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी विमानतळापासून देहूकडे जाणाऱ्या रस्ते सुस्थितीत आहेत का, मुख्य रस्ता, पर्यायी रस्ते, तेथील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर या रस्त्यांवरून पंतप्रधानांचा ताफा जाताना काही अडचणी येऊ नयेत यासाठी पोलिसांनी ‘रिअर्सल’ केली. त्यामुळे नागरिकांमध्ये मोदींच्या दौऱ्याबाबत उत्सुकता होती.
पुणे-मुंबई महामार्ग, आळंदी-मोशी-देहू मार्ग यासह चौका-चौकांत बंदोबस्त होता. यात पुणे-मुंबई महामार्गावर नाशिक फाटा ते निगडी दरम्यानच्या ग्रेड सेपरेटरच्या इनमर्ज आणि आऊट मर्ज येथे पोलीस तैनात होते. तसेच या मार्गावरील पादचारी पुलांवर देखील पोलीस होते. काही ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना अडवून तपासणी करण्यात येत होती. त्यामुळे काही वाहनचालक हुज्जत घालत होते. त्यामुळे त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली.
उन्हामुळे पोलीस सावलीला
दुपारी बारानंतर वाहतूक काही प्रमाणात कमी झाल्याने आणि पंतप्रधान हे हेलिकाॅप्टरने देहू येथे जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. तसेच उन्हाचा चटका वाढल्याने पोलीस सावलीला गेल्याचे दिसून आले.