"वक्त तो वक्त है , आता और जाता है"; कृष्णप्रकाश यांची बदलीवरून भावनिक पोस्ट, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 02:59 PM2022-04-28T14:59:55+5:302022-04-28T15:00:07+5:30
राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात पिंपरी -चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाली
पुणे : राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात पिंपरी -चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाली. कृष्ण प्रकाश रजेवर असल्याने अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पदभार होता. त्यानंतर अंकुश शिंदे यांनी डॉ. संजय शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारला. या सर्व घडामोडीनंतर पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बारामतीत गोविंदबाग येथे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची भेट घेतली. दीड वर्षात त्यांची बदली झाल्याने पवारांच्या भेटीनंतर तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यातच कृष्णप्रकाश यांनी इंस्टाग्रामवरून एक पोस्ट केली आहे. त्यांनी इंस्टामधून पोस्ट केलेल्या शेअरमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मेरे पसीने से मेरे मेहनत की खुशबू आती है
मेरा लहू मेरे रगों में ईमान का रंग भरता है ।
ऐ दौर की दुश्वारियां यूँ न इतरा मेरे हालात पे ,
वक्त तो वक्त है , आता और जाता है । असं ते या पोस्ट मधून म्हणाले आहेत.
कृष्ण प्रकाश यांची अवघ्या दीड वर्षात बदली
आयर्नमॅन अशी ओळख असलेल्या कृष्ण प्रकाश यांची मुंबईत विशेष पोलीस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा येथे बदली झाली. त्यांच्या जागी मुंबई येथील सुधार सेवाचे विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी तात्काळ पदभारही स्वीकारला आहे. बदलीच्या काळात कृष्ण प्रकाश हे रजेवर होते. रजा संपल्यानंतर त्यांनी माघारी येताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. कृष्ण प्रकाश यांची अवघ्या दीड वर्षात त्यांची बदली झाली आहे. गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे प्रकाश यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या पवार यांची भेट घेतल्याचे मानले जाते. कृष्ण प्रकाश बाहेर पडताच या भेटीनंतर पवार देखील कोल्हापूरच्या नियोजित संकल्प यात्रेठी निघून गेले. तसेच पवार यांनी देखील माध्यमांना आज मला भरपूर कामे आहेत, असे म्हणत त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले होते.