आंबेगावात शिवसेनेवर आत्मचिंतनाची वेळ
By admin | Published: February 25, 2017 02:13 AM2017-02-25T02:13:40+5:302017-02-25T02:13:40+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन पाटलांच्या लढाईत अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा विजय झाला
विलास शेटे, मंचर
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन पाटलांच्या लढाईत अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा विजय झाला. राष्ट्रवादीने पंचायत समितीत बहुमत मिळवून जिल्हा परिषदेच्या ४ जागा निर्विवादपणे जिंकल्या आहेत. शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले असून, त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. प्रचारकाळात वळसे-पाटील व आढळराव-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या; मात्र मतदारांनी राष्ट्रवादीला कौल दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीच किंग असल्याचे या निकालाने दिसून आले आहे. मंचर गणातील अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले यांच्या विजयाचा विचार राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांना करावा लागणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आक्रमकपणे प्रचार केला. त्यांच्या टीकेचा रोख वळसे-पाटील यांच्यावर होता. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनीही प्रत्युतर दिले; मात्र त्याचबरोबर विकासकामांचा लेखाजोखा मांडला. दोन्ही बाजूंनी विकासकामे केली नसल्याचा आरोप एकमेकांवर करण्यात आला. अर्थात, प्रचारात केवळ वळसे-पाटील व आढळराव-पाटील हे दोनच नेते असल्याने खरी लढाई दोन पाटलांमध्ये रंगली गेली. शिवसेना व राष्ट्रवादीच्या या लढाईत दिलीप वळसे-पाटील यांची सरशी झाली. मतदारांनी विकासकामांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. ग्रामपंचायतीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने विजय मिळविला आहे. आंबेगाव तालुक्यातील जनता केवळ लोकसभेला शिवसेना म्हणजेच खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या पाठीशी उभी राहते. इतर वेळी मात्र ती राष्ट्रवादीला साथ देत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. सहकारक्षेत्रावर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. संघटनात्मक पातळीवरसुद्धा राष्ट्रवादीचे चांगले काम आहे. त्याउलट, शिवसेनेत संघटना ठराविक ठिकाणीच राहिली आहे. पक्षात काहीशी मरगळ आलेली दिसते. खासदार तालुक्यात असतील तेव्हाच शिवसेनेच्या गोटात काहीशी हालचाल दिसते. इतर वेळी मात्र कामकाज ठप्पच असते.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी तालुक्यात केलेली विकासकामे हाच राष्ट्रवादीचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. शिवसेनेनेही खासदार आढळराव-पाटील यांची विकासकामे हा मुद्दा पुढे केला. मात्र, वळसे-पाटील यांनी प्रचाराची जी आखणी केली, ती प्रभावी ठरली गेली. जिल्हा परिषदेच्या ५ पैकी केवळ एक जागा शिवसेनेला मिळाली, तर उर्वरित ४ जागा राष्ट्रवादीने मोठ्या मताधिक्याने जिंकल्या. पेठ-घोडेगाव गटातील विजयी जागा थोड्याशा मताधिक्याने शिवसेनेला मिळाली. आढळराव-पाटील यांच्या लांडेवाडी गावाच्या मताधिक्यावर हा गट शिवसेनेला मिळतो. या वेळीही तसेच झाले. निकाल अपेक्षित लागले आहेत. कळंब-चांडोली जिल्हा परिषद गटात शिवसेनेला विजयाची आशा होती; मात्र या गटातील काही गावांत राष्ट्रवादीला एकगठ्ठा मतदान झाल्याने जिल्हा परिषदेबरोबरच पंचायत समितीच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. पारगाव अवसरी बुद्रुक गटात चुरशीची लढत झाली. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे पुतणे विवेक वळसे-पाटील यांनी अरुण गिरे यांचा पराभव केला. मात्र, अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणात शिवसेनेला झालेले मतदान राष्ट्रवादीला विचार करायला लावणारे आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पंचायत समितीला शिवसेनेचे रवींद्र करंजखेले निवडून आल्याने राष्ट्रवादीने त्याबाबत चिंतन करणे गरजेचे आहे.