वेळ निघून गेली, आता लक्ष घालणे व्यर्थ

By Admin | Published: June 28, 2017 04:13 AM2017-06-28T04:13:55+5:302017-06-28T04:13:55+5:30

महापालिका निवडणुकीच्या काळात नगरसेवक, पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर होते, त्या वेळी लक्ष घालण्याची विनंती केली.

Time went out, now it's useless to look | वेळ निघून गेली, आता लक्ष घालणे व्यर्थ

वेळ निघून गेली, आता लक्ष घालणे व्यर्थ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या काळात नगरसेवक, पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर होते, त्या वेळी लक्ष घालण्याची विनंती केली. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यास वेळ नव्हता. त्यांनी जातीने लक्ष घालावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, त्या वेळी त्यांना वेळ मिळाला नाही. परिणामी महापालिकेतील १५ वर्षांची सत्ता गमावण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली.
भाजपाने सत्ता काबीज केली. सर्व काही हातचे निसटल्यानंतर
आता लक्ष घालून, कार्यकर्त्यांशी संपर्क साधून साध्य काय करणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्तेच उपस्थित करू लागले आहेत.
फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाने दारून पराभव केला. अवघे ३ नगरसेवक असलेल्या भाजपाने पिंपरी चिंचवड महापालिकेत ७६ नगरसेवक निवडून आणले. निवडणुकीला पाच महिन्याचा अवधी लोटला. आत्मचिंतनासाठी तरी एखादी बैठक घेणे अपेक्षित असताना, कोणीही नेते फिरकले नाहीत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व अजित पवार हे दोघे येत्या ३० जूनपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सभा, बैठका घेण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. सहा जुलैला शहरात बैठक होण्याची शक्यता आहे. याची कुणकुण लागल्याने कार्यकर्ते मनातील खदखद व्यक्त करू लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक यांना प्रवेश देऊन भाजपाने राष्ट्रवादी खिळखिळी केली. राष्ट्रवादीतील तुल्यबळ उमेदवार घेऊनच भाजपाने महापालिकेत सत्ता काबीज केली. पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी कोणी फिरकले नाही. निवडणूक काळात आणि निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याच कधी प्रयत्न केला नाही. एकहाती सत्ता काबीज केलेल्या भाजपाने महापालिकेत त्यांच्या मर्जीचा कारभार सुरू केला आहे. विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, नगरसेवकांना विरोधी पक्ष म्हणूनही ठोस कामगिरी दाखविता येत नाही, खंबीरपणे पाठबळ देणारे कोणी नसल्याने त्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक यांचे मनोधैर्य खचल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Time went out, now it's useless to look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.