कर्जाला कंटाळून आठव्या मजल्यावरून मारली उडी, चिठ्ठीही लिहून ठेवली
By नारायण बडगुजर | Published: September 2, 2023 11:39 PM2023-09-02T23:39:35+5:302023-09-02T23:40:28+5:30
कर्जामुळे मी आत्महत्या करीत आहे. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यात लिहिले आहे.
पिंपरी : शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले तसेच कर्जामुळे एका तरुणाने राहत्या घराच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. चऱ्होली फाटा येथे शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
समाधान दत्तात्रय आहेर (३४, रा. चऱ्होली फाटा, मूळ रा. बार्शी, सोलापूर), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान आहेर यांनी राहत्या घराच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. यात गंभीर जखमी झाला. याबाबत माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समाधान यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी पोलिसांना सांगितले. समाधान आहेर यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. कर्जामुळे मी आत्महत्या करीत आहे. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यात लिहिले आहे.
समाधान यांच्या मागे पत्ती, आठ महिन्यांचा मुलगा, आईवडील आहेत. त्यांची पत्नी माहेरी होती. तसेच आईवडील गावी होते. समाधान हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होते. त्यात त्यांना नुकसान झाले, असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.