दहशत माजविण्यासाठी टोळक्याकडून तोडफोड, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 05:58 AM2017-12-17T05:58:30+5:302017-12-17T05:58:38+5:30
उसने पैसे दिले नाहीत तसेच अविनाश धनवे यास भाई म्हणाला नाही या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने दिघी फाटा परिसरात दुकाने, स्टॉल यांची तोडफोड केली. दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.
पिंपरी : उसने पैसे दिले नाहीत तसेच अविनाश धनवे यास भाई म्हणाला नाही या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने दिघी फाटा परिसरात दुकाने, स्टॉल यांची तोडफोड केली. दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास देहू फाटा येथे घडला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी चहा स्टॉल, स्नॅक्स सेंटर, पान शॉपची लोखंडी कोयते, लाकडी बांबूनी तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. सिद्धेश्वर सीताराम गोवेकर (वय २७), बालाजी मारुती वाळुंज (वय २२) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांचे साथीदार अविनाश धनवे, वसीम शेख, मयूर मडके, प्रशांत लोहकरे यांच्यासह चार ते पाच अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पप्पू ऊर्फ अभिमन्यू शितोळे (वय २८, देहू फाटा, आळंदी) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पप्पू शितोळे याचे देहू फाटा येथे बारामती चहा स्टॉल आहे. शुक्रवारी रात्री आरोपी पप्पू याच्या चहा स्टॉलवर आले होते. त्यांनी पप्पू याच्याकडे उसने पैसे मागितले होते. परंतु, पैसे देण्यास पप्पूने नकार दिला. याचा आरोपींना राग आला. दहा जणांच्या टोळक्याने हातात लोखंडी कोयते, लाकडी दांडके घेऊन तिथे आले. पप्पू याचे चहा स्टॉल, ज्ञानेश्वर मोरे यांचे स्नॅक्स सेंटर, पान शॉप, रसवंतीगृह आणि माऊली पाटील यांच्या स्नॅक्स सेंटरची तोडफोड केली. यामध्ये अंदाजे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दिघी ठाण्याचे फौजदार जे. एस. शेंडगे तपास करत आहेत.
सांगवीत एकास टोळक्याकडून मारहाण
पिंपरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवसाई सोसायटी, पिंपळे सौदागर येथे शुभम कवटे या आरोपीने अन्य साथीदारांच्या मदतीने शत्रुघ्न पालमपल्ले (वय २१, रा. पिंपळे सौदागर ) याच्यावर कोयत्याने वार केले. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम कवटे, सुमीत सोमवंशी, दीपक धोत्रे, आनंद संगमे व अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम़ के़ आहेर तपास करीत आहेत.