आजपासून पाणीपुरवठा पूर्ववत
By admin | Published: July 2, 2017 02:50 AM2017-07-02T02:50:35+5:302017-07-02T02:50:35+5:30
महापालिकेने अवलंबलेला १० टक्के पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे़ रविवारपासून पूर्ववत नियमित पाणीपुरवठा होईल, अशी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिकेने अवलंबलेला १० टक्के पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे़ रविवारपासून पूर्ववत नियमित पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी आज दिली. शहरातील नागरिकांना मुबलक व पुरेसा पाणीपुरवठा होईल, असा दावा काळजे यांनी केला.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून महापालिकेने २ मे २०१७ ला २५ टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला. शहरवासीयांना दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता.
३० मे २०१७ ला पाणीकपात २५ टक्यांवरून १० टक्के केली होती. परंतु, पाणीपुरवठा दिवसाआडच सुरू होता. १३ जून २०१७ पासून पाणी कपात मागे घेऊन शहरवासीयांना रोज पाणीपुरवठा सुरू केला.
परंतु, १० टक्के पाणी कपात कायम ठेवली होती. आता ही पाणीकपात देखील मागे घेण्यात आली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे़
पवना धरणात ३१ मे रोजी २०.२८ टक्के पाणीसाठा होता. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. पंरतु, त्यांनतर थोड्याच दिवसांत पावसाने दडी मारली. २५ जूनपासून पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे ९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत तब्बल ६८६ मिमी पावसाची नोंद झाली. सध्या धरणात २.५७६ टीएमसी पाणीसाठा आहे. पाच दिवसांत पवना धरण साठ्यात १३.१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा ३३.४३ टक्के इतका आहे.