प्रवेशशुल्क वसुली आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:52 AM2017-08-04T02:52:48+5:302017-08-04T02:52:48+5:30
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत गुरुवारपासून वाहन प्रवेशशुल्क वसुली सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर विविध कारणांनी गुरुवारी प्रवेशशुल्क वसुली सुरू होऊ शकली नाही.
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत गुरुवारपासून वाहन प्रवेशशुल्क वसुली सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर विविध कारणांनी गुरुवारी प्रवेशशुल्क वसुली सुरू होऊ शकली नाही. ती आता शुक्रवारी (दि. ४) सुरू होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी कॅन्टोन्मेंटच्या विशेष बैठकीत ठराव मंजूर झाला. मात्र, पावतीपुस्तकांची छपाई, कामगारांची जुळवाजुळव यात दोन दिवस गेल्याने येत्या शुक्रवारी वाहन प्रवेश शुल्क वसुली पाच ठिकाणी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विकासनगर-किवळे रस्त्यावर प्रथमच वाहन प्रवेश शुल्क वसुली सुरू होणार आहे. बुधवारी व गुरुवारी सर्व नाक्यांवर साफसफाई, फर्निचर जमवाजमव, शुल्क आकारणीचे फलक लावण्यात येत होते.
वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्याने बंद असलेली वाहन प्रवेशशुल्क वसुली पुन्हा आकारण्याचा ठराव मंजूर करून गुरुवारपासून (दि. ३) शुल्क वसुली करण्याचे जाहीर केले होते. मात्र महिनाभर बंद असल्याने नाक्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत व झाडेझुडपे वाढली होती. नाक्यांसाठी अधीक्षक, एक निरीक्षक, कारकून व शिक्षकांसह ठेकेदाराकडील १५ कामगार असे ३९ कर्मचारी नेमले आहेत. बुधवारी सकाळपासून नाक्यांच्या परिसरात साफसफाई व गवत काढण्यास सुरुवात झाली. गुरुवारी प्रवेशशुल्क वसुलीचे नवे दर दर्शविणारे फलक नाक्याच्या परिसरात लावण्याची कर्मचाºयांची लगबग सुरू होती. विविध शुल्कांच्या पावत्या गुरुवारी छपाई करून मिळाल्या असून, कर्मचाºयांना लागणारे आवश्यक लेखन सामग्री, साहित्य, फर्निचर आदी पोहोच करण्यात येत होेते. मध्यरात्री बारानंतर शुक्रवारी नाक्यांवर शुल्क वसुली सुरू करण्याची तयारी व नियोजन पूर्ण करण्यात आल्याचे कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत यांनी सांगितले. विकासनगर - किवळे रस्त्यावर शंकर मंदिरासमोर दीड वर्षांपूर्वी उभारलेल्या नाक्यावर प्रथमच वाहन प्रवेशशुल्क वसुली सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.