एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी सासरच्यांनी केला छळ ; विवाहितेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 11:06 AM2019-11-01T11:06:12+5:302019-11-01T11:07:33+5:30
स्पर्धा परीक्षा देऊन नाेकरी करावी, तसेच लग्नात विविध वस्तू दिल्या नाहीत म्हणून सासरच्यांनी विवाहीतेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहीतेने आत्महत्या केली.
पिंपरी : एमपीएससीची परीक्षा देऊन नोकरी करावी, असा सासरच्यांनी विवाहितेकडे हट्ट केला. त्यावरून व घरगुती किरकोळ कारणांवरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मोशी येथे बुधवारी (दि. ३०) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली सुनील कदम (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेच्या ५० वर्षीय आईने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पती सुनील रामलिंग कदम, सासरे रामलिंग कदम, सासू आदिका कदम, दीर सचिन कदम, सतीश कदम (सर्व रा. सिद्धेश्वर नगर,देहूरस्ता, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी रामलिंग कदम याला पोलिसांनी अटक केली आहे.
सायली यांच्या माहेरच्या लोकांच्या नावे असलेली जमीन त्यांनी सासरच्या मंडळींच्या नावावर करून द्यावी, अशी मागणी आरोपींनी सायली यांच्याकडे केली. तसेच सायली यांच्या लग्नात त्यांच्या माहेरच्यांनी फ्रीज, टीव्ही अशा वस्तू दिल्या नाहीत म्हणून सासरच्यांनी त्यांचा छळ केला. सायली यांनी एमपीएससीची परीक्षा देऊन नोकरी करावी, तसेच घरगुती किरकोळ कारणावरून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. सासरच्या त्रासाला कंटाळून बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास सायली यांनी राहत्या घरात साडीच्या साहाय्याने फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.