पैशांसाठी विवाहितेचा छळ, नंतर गळा आवळून खून; पती आणि सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 08:30 PM2023-02-19T20:30:52+5:302023-02-19T20:31:06+5:30

किराणा दुकान आणि चारचाकी वाहनासाठी महिलेचा सासरच्यांनी छळ केला.

Torture of spouse for money, then murder by strangulation; Case filed against husband and mother-in-law | पैशांसाठी विवाहितेचा छळ, नंतर गळा आवळून खून; पती आणि सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

पैशांसाठी विवाहितेचा छळ, नंतर गळा आवळून खून; पती आणि सासू-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Next

पिंपरी : किराणा दुकान आणि आलिशान चारचाकी वाहनासाठी पैसे आण असे म्हणून महिलेचा सासरच्यांनी छळ केला. त्यानंतर ओढणीने गळा आवळून पतीने तिचा खून केला. जाधववाडी, चिखली येथे शनिवारी (दि. १८) ही घटना उघडकीस आली. श्वेता प्रवीण जाधव (वय २७), असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

तिचे वडील सोमनाथ हरिभाऊ होले (रा. वानवडी, पुणे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार श्वेता हिचा पती प्रवीण काळूराम जाधव (वय ३०), सासरा काळूराम विठ्ठल जाधव, सासू प्रमिला काळूराम जाधव (सर्व रा. जाधववाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता आणि प्रवीण यांचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. त्यांना पाच वर्षांचा एक मुलगा आहे. प्रवीण जाधव याचे जाधववाडी येथे किराणा दुकान आहे. या दुकानासाठी तसेच आलिशान चारचाकी वाहनासाठी श्वेता हिने माहेरून पैसे आणावेत, अशी मागणी करून आरोपींनी तिचा छळ केला. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. पती प्रवीण याने श्वेता हिचा ओढणीने गळा आवळला. यात श्वेता हिचा मृत्यू झाला. मात्र, तिला चक्कर आल्याचे सांगत तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Torture of spouse for money, then murder by strangulation; Case filed against husband and mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.