मौजमजेसाठी तब्बल ११ दुचाकी चोरांना मुद्देमालासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 08:43 PM2018-07-14T20:43:06+5:302018-07-14T20:43:11+5:30
दुचाकी विक्रीतून येणारा पैसा ते मौजमजेसाठी खर्च करत असत. मौजमजेसाठी पैसे मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी चोरीचा मार्ग अवलंबला होता.
पिंपरी : दुचाकी चोरून कवडीमोल किंमतीला विक्री करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या. मौजमजेसाठी दुचाकींची चोरी करीत असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. याप्रकरणी अरबाज बशीर शेख (वय २१, रा गहूंजे) याच्यासह दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत चतुः श्रुंगी विभागाचे सहायक आयुक्त कल्याणराव विधाते यांनी पत्रकार परिषदेत दुचाकी चोरट्यांवरील कारवाईची माहिती दिली. तपास पथकाचे उपनिरीक्षक हरीश माने हे हद्दीत कर्मचाऱ्यांसह गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार धनराज किरनाळे यांना वाकड हिंजवडी हद्दीत दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार मुंबई बंगळूर महामार्गावर थांबल्याची माहिती मिळाली. तेथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्याने ११ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
अरबाज शेख याने १५ आणि १६ वर्ष वयाच्या दोघा अल्पवयीन मुलांना दुचाकी चोरीसाठी बरोबर घेतले होते. एकप्रकारे त्यांना दुचाकी चोरण्याचे त्याने प्रशिक्षण दिले होते. बनावट चावी किंवा हँडल लॉक तोडून दुचाकी पळपुन नेली जात असे. चोरलेल्या दुचाकी या तिघांनी वाई, सातारा, आणि पुणे जिह्यातील ग्रामीण भागात कवडीमोल भावात विक्री केल्या. दुचाकी विक्रीतून येणारा पैसा ते मौजमजेसाठी खर्च करत असत. मौजमजेसाठी पैसे मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी चोरीचा मार्ग अवलंबला होता. ११ दुचाकींपैकी ५ दुचाकी वाकड पोलीस ठाण्याच्या आणि ६ हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरल्याची कबुली त्यांनी दिली.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरीश माने, धनराज किरनाळे, दादा पवार, बिभीषण कण्हेरकर, बापू धुमाळ, अशोक दुधवणे, विक्रांत गायकवाड व मधुकर चव्हाण यांच्या पथकाने केली