पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाचा निषेध मोर्चा; शेकडो मराठा बांधव सहभागी
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: November 2, 2023 12:52 PM2023-11-02T12:52:23+5:302023-11-02T12:52:35+5:30
शिंदे- फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांचा गटही मोर्चात सहभागी
पिंपरी : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज गुरुवार (दि.२) तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. सर्वपक्षीय नेत्यांनी आणि विविध असंख्य संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला होता. तसेच या मोर्चात पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे- फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांचा गटही मोर्चात होता.
विविध घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे..अशा घोषणांनी आकुर्डी-निगडी परिसर दणाणून सोडले. मोर्चाची सुरुवात आकुर्डीतील खंडोबा माळ येथून सुरवात झाली. जुनामुंबई पुणे हायवे मार्गाने निगडीतील तहसील कार्यालयावरधडकला. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात केलाल होता.